वडगाव हवेली : कऱ्हाड तालुक्यातील दुशेरे येथील कृष्णा नदी पात्रामध्ये बुधवार, दि. २५ सकाळी १० वाजण्याच्यासुमारास मगरीचे दर्शन झाले. त्यामुळे दुशेरेसह आटके, कोडोली, कार्वे, शेरे, गोंदी, रेठरे बुद्रुक, रेठरे खुर्द, खुबी, मालखेड या नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कृष्णा नदीवर दुशेरे येथील शेतकरी पंकज जाधव, अनिल जाधव, छगन मदने, भास्कर चव्हाण, मारुती जाधव, रामराव जाधव आदी शेतकरी शेतीच्या कामासाठी गेले असता, त्यांना नदीपात्रात मगरीचे दर्शन झाले. नदीच्या पाण्यात मगर वावरत असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. ही माहिती समजल्यानंतर गावातील ग्रामस्थांनीही त्याठिकाणी धाव घेतली. पाण्यात वावरणारी मगर काही वेळानंतर गायब झाली.
अतिवृष्टीमुळे कृष्णा नदीला पूर आला होता. तो ओसरल्यानंतर कृष्णा पात्रात अनेक ठिकाणी मगरीचे दर्शन झाले होते. आता कऱ्हाड तालुक्यातील दुशेरे, आटके, कोडोली, कार्वे, शेरे, गोंदी, रेठरे बुद्रुक, रेठरे खुर्द, खुबी, मालखेड आदी गावांमध्ये मगरीचे दर्शन झाले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शेतकऱ्यांना नदीकाठावरील शेतात कामासाठी जाताना भीती वाटत आहे. त्यामुळे वनविभागाने तात्काळ या मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.