कुडाळ : आधुनिक काळात शेतीव्यवसाय बदलत आहे. शेतकऱ्यांनी याची दखल घेत आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग केले पाहिजेत. सुधारित तंत्रज्ञानाच्या वापराबरोबरच पिकांसाठी तयार होणाऱ्या नवीन वाणाचा उपयोग करून अधिक उत्पादन घ्यावे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे माजी संचालक डॉ. शरद गडाख यांनी केले.
राज्यस्तरीय रब्बी पीक स्पर्धा २०२० च्या विजयी शेतकऱ्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून सोनगाव ता. जावली येथे सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
सन २०२० मधील राज्यस्तरीय रब्बी हंगाम ज्वारी पीक स्पर्धेतील राज्यात प्रथम येणाऱ्या साहेबराव मन्याबा चिकणे, सोनगाव व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या वाई तालुक्यातील वरखडवाडी येथील शेतकरी नितीन बाजीराव वरखडे यांना महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीच्यावतीने डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ विद्यापीठाचे प्रकाशन कृषी दर्शनी आणि रेवती वाणाचे बियाण्यांची एक बॅग देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जावली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जयदीप शिंदे, शशिकला किर्वे, सरपंच सोनगाव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत गोरड, नारायण शिंदे, ज्ञानदेव जाधव, किरण बर्गे, विक्रम मोहिते, शांताराम इंगळे, पांडुरंग खाडे, भानुदास चोरगे, सोनगव ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख व उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत गोरड यांनी मार्गदर्शन केले. प्रा. मोहन शिर्के यांनी प्रास्ताविक केले. डॉ. महेश बाबर सूत्रसंचालन केले तर भूषण यादगीरवार यांनी आभार मानले.
चौकट
कृषी विद्यापीठ, राहुरी येथून ज्वारी सुधार प्रकल्पातील ज्वारी पैदासकार, कीटकशास्त्रज्ञ, रोगशास्त्र विभागातील तज्ज्ञांनी ज्वारी लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान तसेच विकसित वाण यावर मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कायम मार्गदर्शन करण्यात येत आहे. यामुळेच रब्बीच्या पीक स्पर्धेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिकतम उत्पादन घेण्याचा बहुमान मिळवला आहे. यासाठी फिल्डवर मार्गदर्शन करणाऱ्या कृषी सहाय्यक भानुदास चोरगे व मनोज पाटील यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.