फलटण : शेतकऱ्यांची शेतीशाळा या उपक्रमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व सुधारित औजारांची माहिती दिली जाते. शेतीतज्ज्ञ बनविणे आणि उत्पादनखर्च कमी करून अधिक एकरी उत्पादनाद्वारे शेती फायदेशीर ठरविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी भास्करराव कोळेकर यांनी केले.
महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत राजाळे येथे भाजीपाला पिकांवरील कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पांतर्गत भेंडी पीक शेतीशाळेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी निवृत्त प्राचार्य डॉ. पाडुरंग मोहिते, प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग, सरपंच सविता शेडगे, उपसरपंच शरद निंबाळकर, संभाजी निंबाळकर, भरत रणवरे, समीर खिलारे, लक्ष्मण पाटील, अजित पवार, ग्रामपंचायत सदस्य दिलीप भालेराव, रामभाऊ निंबाळकर, प्रेमचंद भोईटे, ब्रह्मदेव शेडगे, पोलीस पाटील महेश शेडगे, कृषी सहायक सचिन जाधव उपस्थित होते.
पाडुरंग मोहिते यांनी भेंडी पिकांवरील कीड व रोग या विषयावर दृकश्राव्य माध्यमातून मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही यावेळी देण्यात आली.
प्रा. संतोष सोनवलकर यांनी जैवइंधन विषयावर मार्गदर्शन केले. शेतीशाळा उपक्रमात सहभागी होऊन मारुती ताठे या शेतकऱ्याने भेंडी पिकांचे उत्कृष्ट उत्पादन घेतल्याबद्दल उपविभागीय कृषी अधिकारी भास्करराव कोळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन कृषी सहायक सचिन जाधव यांनी केले.