कुडाळ : कोरोनाच्या संकटामुळे या वर्षी कारखान्यांचा गळीत हंगाम उशिरा सुरू झाला. पुरेशा तोडणी यंत्रणेअभावी परिसरातील ऊस गेले १७ ते १८ महिने शेतातच उभा आहे. उसाला तुरेही फुटू लागले आहेत. यामुळे उसाला लवकर तोड मिळावी यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.
कुडाळ आणि परिसरातील बहुतांश गावांमध्ये उसाचे क्षेत्र अधिक आहे. या वर्षी चांगल्या पर्जन्यमानामुळे उसाचे पीक जोमात आले होते. गतवर्षी जून-जुलै महिन्यात लागण केलेल्या या उसाला १७ ते १८ महिने होत असून तुरे फुटले आहेत. अशातच ऊसतोडणीसाठी कारखान्यांकडून पुरेशी यंत्रणा उपलब्ध न झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. उसाची वाढ आता पूर्ण झाली असून लवकर ऊसतोड न मिळाल्याने उसाचे तुरे फुटून पडू लागले आहेत. परिसरात काही ठिकाणी कारखान्यांच्या थोड्याच टोळ्या उसाची तोड करीत आहेत. भागातील ऊसक्षेत्राचा विचार करता ऊसतोडणीची ही यंत्रणा पुरेशी नाही. यामुळे जून-जुलै महिन्यात लागण केलेला ऊस आजही शेतात उभा दिसत आहे. उसाला तुरे आलेले असून आतून पोकळ झाला आहे. यामुळे उसाच्या वजनात घट होणार आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
अशातच शेतकरी ऊसतोडणीसाठी स्लिप बॉय, टोळीच्या मुकादमाकडे हेलपाटे मारत आहेत. फडाला लवकर तोड कशी मिळेल याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. कारखान्यांनी याकडे लक्ष देऊन ऊसतोडणीसाठी पुरेशी यंत्रणा द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
कोट :
ऊस तोडण्यासाठी कारखान्यांकडून उशीर होत आहे. यामुळे ऊसतोड कधी होणार, याची वाट पाहत आहे. तसेच खोडवा, नेडवा उसाचे काय होणार, ही चिंतेची बाब आहे. यात उसाला तुरे फुटल्याने आतून पोकळ झाला आहे. वजन घटणार असून याचा तोटा सहन करावा लागणार आहे. ऊसतोडणीसाठी टोळ्या कमी असून कारखान्यांनी यासाठी तोडणीसाठी टोळ्यांची योजना करावी आणि ऊसतोड लवकर करावी.
- मुरलीधर नवले,
शेतकरी
फोटो
२४कुडाळ-शुगर केन
जावळी तालुक्यातील उसाला तुरे फुटले असून अजूनही ऊस कारखान्याला गेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. (छाया : विशाल जमदाडे)
फोटो : कुडाळ भागातील उसाला तुरे फुटलेले आहेत.