गेल्या सात-आठ वर्षांपासून पाऊसकाळ कमी कमी होत असल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून विहिरीतील पाणीपातळी हळूहळू कमी होवू लागली आहे. तर महिन्यापूर्वीच रानावनात असणारे लहान-मोठे ओढे, नाले, बंधारे आटले असून चिमणीला पिण्यासही पाणी उरले नाही.
नदीवरून पाणीपुरवठा करून क्षेत्र ओलीताखाली आणलेल्या उपसावे जलसिंचन पाणी योजनांच्या क्षेत्रात असणाऱ्या विहिरींना बऱ्यापैकी पाझर होत असून सहा - सात तास चालत आहेत. एप्रिल महिना चालू झाल्यापासून दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असून अनेक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक मालकीच्या विहिरींनी तळ गाठला आहे. दररोज कसाबसा एक ते दीड तासच विद्युत पंप चालत आहेत. महिन्यात पूर्णपणे विहिरी आटतील, अशी भीती शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.
माळरान व हलक्या प्रतीच्या जमिनीतील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी आभाळकडे डोळे लावून वळीव पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांनी उशिरा टोकण केलेले गहू, हरभरा पिके कसेबसे काढले आहे.आता ऊस पिकाला पाणी मोठ्या प्रमाणात लागत आहे. भरपूर पाणी नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा ऊस पिवळा पडत आहे. चालू वर्षी मे महिना सुरू होण्यापूर्वीच विहिरी तळ गाठतील, अशी भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
कोट
चालू वर्षी एप्रिल महिन्यातच विहिरींना दणका बसला असून दोन तासांवर विहीर आली आहे. पाऊस सुरू होईपर्यंत पिके जगविणे अवघड झाले आहे. वळीव पाऊस पडला तर पिके जगतील नाहीतर अवघड परिस्थिती आहे.
सागर शेडगे
शेतकरी
विहे शेडगेवाडी