लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ४ लाख मदत मिळणार असल्याचा बनावट मेसेज फिरत असून, या अर्जांचे करायचे काय? असे म्हणत प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना डोक्यावर हात मारुन घ्यावा लागतो आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना चार लाखांची भरपाई मिळणार, असा बनावट मेसेज आणि सोबत बनावट अर्ज व्हायरल झाल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. सातारा जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने प्रशासनाकडे अर्ज आलेले आहेत. प्रशासनाकडे अशा अर्जांचा ढीग साठतो आहे. या अर्जांचे करायचे काय? हा प्रश्न सतावतो आहे.
या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.
१) काय आहे बनावट मेसेज
कोरोना महामारीमुळे ज्या व्यक्तीने मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत शासनाच्यावतीने दिली जाणार आहे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती विभागात अर्ज दाखल करावा, असा बनावट मेसेज फिरतो आहे.
२) आपत्ती व्यवस्थापनाकडे आले दोन हजार अर्ज
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ही मदत मिळावी म्हणून तब्बल दोन हजार अर्ज दाखल झाले आहेत. प्रशासनाच्यावतीने हे अर्ज वरिष्ठ पातळीवर जातील, अन् आर्थिक मदत मिळेल, अशी भाबडी आशा लोक धरुन बसले आहेत. या अर्जांबाबत प्रशासनाने संबंधितांना पत्र पाठवून अशी कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट केले आहे.
३) या अर्जांचे काय करणार?
जिल्हाधिकारी कार्यालयात रोज वेगवेगळी निवेदने सादर होत असतात. विशेषत: सामाजिक संघटनांच्यावतीने नित्याने आंदोलनाचा इशारा देणारी निवेदने येत असतात, आता त्यात याची भर पडली असल्याने या अर्जांचे करायचे काय? हा प्रश्न अधिकाऱ्यांना सतावत आहे.
४) अर्ज करू नका, अशी कुठलीही योजना नाही
शासनाने अशी कोणतीही योजना लागू केलेली नाही. जर कोणतीही योजना शासनाने जाहीर केली तर तसा लेखी आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त होत असतो, या प्रकरणात मात्र तसे काहीच झाले नसून, अशा फसव्या मेसेजला फसून अर्ज करू नये.
देवीदास ताम्हाणे, जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी