वाई : महाराष्ट्रात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असली तरी दहावी बोर्डाची परीक्षा देणारे विद्यार्थी आणि त्याचे पालक हे अद्यापही भावनिक, मानसिक लॉकडाऊनमध्ये अडकल्याचे चित्र कमीअधिक प्रमाणात सर्वत्र पाहायला मिळत आहे.
गेले वर्षभर दहावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अभ्यास केला; मात्र विविध विषयांतील न समजलेले मुद्दे, उपस्थित होणारे प्रश्न व शंका, नेमका कसा अभ्यास करायचा हे न उलगडलेले कोडे, कोणाकडून योग्य मार्गदर्शन मिळेल याचा उडालेला गोंधळ अशा कोंडमाऱ्यात अडकलेले विद्यार्थी एका बाजूला दिसतात, तर दुसऱ्या बाजूला आपल्या पाल्याचे नेमके काय चालले आहे, त्याला मदत कशी करता येईल ही पालकांची चलबिचल चालू आहे.
यावर मार्गदर्शन करण्यासाठी वाईतील दिशा अकॅडमीने विविध विषयांचे मार्गदर्शन करणारे मोफत वेबिनार आयोजित केले आहे. ३१ जानेवारी ते २१ मार्चदरम्यान येणाऱ्या प्रत्येक रविवारी हे वेबिनार असेल. यात प्रत्येक्ष बोर्ड परीक्षेसाठी पेपर कसा सेट केला जातो, परीक्षकांच्या विद्यार्थ्यांकडून असलेल्या अपेक्षा, आदर्श उत्तरे कशी असावीत, अशा विविध पातळ्यांवर दहावी बोर्डाच्या पॅनलवर काम करणारे तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ज्यामुळे अभ्यासाचा ताण हलका होईलच, शिवाय विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत जास्त मार्क मिळवू शकतील. हे वेबिनार फ्री असेल.
३१ जानेवारी रोजी पहिला वेबिनार प्रा. डॉ. नितीन कदम घेणार असून, शेवटच्या ९० दिवसांत दहावी बोर्ड परीक्षेचा अभ्यास कसा करायचा याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांनी नावनोंदणी करण्यासाठी दिशा अकॅडमीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आहे. (वा.प्र.)