पुसेगाव : पुसेगाव पोलीस ठाण्याच्यावतीने खातगुण हद्दीत पुसेगाव जाखणगाव रस्त्यावर अवैद्यरित्या गौणखनिज वाळू उपसा व वाहतूक केली जात आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून सुमारे ६ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गजानन लावंड, दीपक लावंड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
कोरोना काळात प्रत्येक माणसाला जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. महसूल, पोलीस व ग्रामपंचायत प्रशासन ‘ब्रेक द चेन’ कामात व्यस्त असताना वाळू माफियांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. येरळा नदीपात्रात पुसेगाव ते नेर तसेच पुसेगाव ते काटकरवाडी दरम्यान रात्रभर वाळू उपसा होत असल्याची नागरिकांत चर्चा आहे. सध्या तर रात्रीबरोबरच भर दुपारीही वाळू तस्करी सुरू आहे. खातगुण हद्दीत पुसेगाव जाखणगाव रस्त्यावर दोन ट्रॅक्टर अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक करत असल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी तातडीने पोलीस पथक पाठवून सापळा लावला. त्यानंतर सुमारे ६ लाख ८८ हजार रुपयांचा माल जप्त करून खातगुण येथील दोघां लावंड बंधूंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फोटो ०९पुसेगाव
खातगुण हद्दीत अवैध वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टर व वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले, पोलीस हवालदार सुधाकर भोसले, सुरेश घाडगे उपस्थित होते. (छाया : केशव जाधव)