नाशिक : दहावीची परीक्षा उत्तीर्ण नसताना दोघा संशयितांनी पास असल्याचे बनावट प्रमाणपत्र भोसला महाविद्यालयास देऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ नीलेश अर्जुन बर्वे (रा़ जेलरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भोसला महाविद्यालयात जून २०१४ मध्ये बारावीच्या प्रवेश प्रक्रियेचे काम सुरू होते़ त्यावेळी संशयित प्रशांत शशिकांत गडाख (२६, रा. हनुमाननगर, गंगापूररोड) व प्रल्हाद मेंगाळ (रा. तळेगाव, ता. इगतपुरी) या दोघांनी संगनमत करून भोसला सैनिकी महाविद्यालय व नाशिक विभागीय मंडळाची फसवणूक केली.संशयित प्रशांत हा दहावी उत्तीर्ण नसतानाही त्याने बारावीच्या प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण असल्याचा बनावट दाखला तयार केला. बनावट गुणपत्रक, उत्तीर्ण प्रमाणपत्र तसेच स्वत:च्या वैद्यकीय माहितीचा अर्ज भरून त्यावर मित्र प्रल्हाद मेंगाळचा फोटो लावून ती कागदपत्रे महाविद्यालयात जमा केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे महाविद्यालयात प्रवेश घेतल्याची बाब महाविद्यालय प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फसवणुकीची फिर्याद दिली़ (प्रतिनिधी)
बनावट प्रमाणपत्राद्वारे महाविद्यालयात प्रवेश
By admin | Updated: November 30, 2015 22:50 IST