सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात पूर्णवेळ कार्यकारी अभियंता मिळावा, या मागणीसाठी नगराध्यक्ष विजय बडेकर, माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, नगरसेवक अॅड. डी. जी. बनकर, निशांत पाटील, सुवर्णा पाटील यांनी आंदोलन छेडल्यानंतर जोरदार हालचाली झाल्या. खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी थेट पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे सातारकरांच्या लोकभावना मांडल्या. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन लोणीकर यांनी दिले. जीवन प्राधिकरणाला गेल्या पाच वर्षापासून पूर्णवेळ कार्यकारी अभियंता उपलब्ध करुन देण्यात आलेला नाही, कधी उपअभियंत्याकडे कार्यकारी अभियंत्याचा भार, तर काही वेळा अतिरिक्त कार्यभार देण्यात पांच वर्षे निघून गेली, त्यामुळे जीवन प्राधिकरणच्या कारभारात मरगळ येऊन, त्याचा फटका शाहुनगरवासियांना बसत आहे. जीवन प्राधिकरणच्या ढिसाळ कारभारावर नागरीकांमध्ये असंतोष पसरला आहे. परिणामी टाळेठोक आंदोलनासारखे प्रकार वारंवार होत आहेत. याबाबत शासनाने तातडीने सातारच्या जीवन प्राधिकरण कार्यालयास पूर्णवेळ कार्यकारी अभियंता उपलब्ध करुन द्यावा अशी प्रमुख मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना समक्ष मंत्रालयात भेटून मांडली. याबाबत तातडीने कार्यवाही करु, असे आश्वासन बबनराव लोणीकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना यावेळी दिले. खासदार उदयनराजे भोसले यांनी बबनराव लोणीकर यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सातारा शहर व उपनगरास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाव्दारे पाणीपुरवठा होत असून, सातारची वाढीव पाणीपुरवठा योजना, शाहुपूरीची नवीन २४ बाय ७ योजना, उपनगरातील दैनंदिन पाणीपुरवठा इत्यादी कामे गेल्या पाच वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून, कार्यकारी अभियंता या पदावर पूर्णवेळ अधिकारी नसताना हाताळली जात आहेत.कार्यकारी अभियंता हे पद गेल्या पाच वर्षांपासून पूर्णवेळ कधीच कार्यरत नव्हते, त्यामुळे पाणीपुरवठ्यासारख्या नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत दुर्लक्ष होवून, सुरळीत व समान दाबाने पाणीपुरवठा करण्यात सातत्याने समस्या निर्माण होत आहेत. यावर ‘आपण स्वत: लक्ष देवून, पूर्णवेळ कार्यकारी अभियंता नेमण्याची कार्यवाही तातडीने करु’, असे आश्वासन यावेळी मंत्र्यांंनी दिले.याप्रसंगी नगरसेवक अॅड. डी. जी.बनकर, अशोकराव सावंत, इत्यादी उपस्थित होते. (प्रतिनिधी) ‘लोकमत’ च्या वृत्ताची खासदारांकडून दखल --महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाला पूर्णवेळ कार्यकारी अभियंता नसल्याने शहरातील विविध पाणी योजनांची कामे रखडली आहेत. या प्रश्नावर माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, नगराध्यक्ष विजय बडेकर आदींनी आंदोलन केल्यानंतर ‘लोकमत’ ने खासदार व आमदारांनी याप्रकरणी लक्ष घालण्याविषयीचे वृत्तात म्हटले होते. याची दखल घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी याबाबत आवाज उठविला आहे.
अभियंत्याची नियुक्ती लवकरच
By admin | Updated: June 10, 2016 00:21 IST