कोयनानगर : कोयना भागातील बाधित गावातील ग्राम दक्षता समितीने जनता कर्फ्यू लावावा तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नियमाच्या कडक अंमलबजावणीचे आदेश तहसीलदार योगेश टोम्पे यांनी दिले.
हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सरपंच पोलीस पाटील व ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते .
कोयना भागात कोरोनाचे संक्रमण वेगाने होत आहे. पाच जण मृत्युमुखी पडल्याने सोमवारी सायंकाळी तहसीलदार योगेश टोम्पे यांनी कोयना भागातील बाधित गावांना भेटी दिल्या. यावेळी गटविकास अधिकारी मीना साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत माळी, सुप्रीम कांबळे उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार टोम्पे यांनी कोयना भागात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी बंधनकारक राहील तसेच ग्रामस्तरावरील दक्षता समिती क्रियाशील होऊन आरोग्य कर्मचाऱ्यांनी तपासणी सर्वेक्षण कामात सहकार्य करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
यावेळी गटविकास अधिकारी मीना साळुंखे यानी जास्त बाधित गावांत सरसकट चाचण्या घेणे, गावात दक्षता समितीला सोबत घेऊन आशासेविकांनी काम करावे, कामात अडथळा आणल्यास पोलिसांची मदत घ्यावी, आदी सूचना केल्या आहेत.