सातारा : शहरात रस्त्यावर बसून भाजी विक्री करणाऱ्यांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी धडक मोहीम राबविली. शहरातील मंगळवार तळे मार्ग, राजवाडा परिसर, गोडोली, प्रतापगंज पेठ येथील भाजी व फळ विक्रेत्यांवर कारवाई करून अनेकांचे साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे प्रदीर्घ कालावधीनंतर शहरातील रस्ते वाहतुकीसाठी मोकळे झाले.
सातारा शहरात प्रशस्त भाजी मंडई असताना हजारो भाजी व फळ विक्रेते फुटपाथ, रस्त्यावर तसेच प्रमुख चौकांत बसून व्यवसाय करतात. रस्त्यावर भरणाऱ्या या बाजारामुळे वाहतुकीसह पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या समस्यांचा आढावा घेत ‘लोकमत’ने ‘कितीही कारवाई करा.. मंडईसाठी गड्या आपला रस्ताच बरा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांच्या पथकाने शुक्रवारी शहरात धडक मोहीम राबविली.
भाजी विक्रेत्यांनी गजबजणाऱ्या मंगळवार तळे मार्गावरील सर्व विक्रेत्यांना हटविण्यात आले. शिवाय गोडोली चौक, प्रतापगंज पेठ, राजपथावरील फुटपाथ, राजवाडा परिसर येथील भाजी व फळ विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. कारवाईच्या धास्तीने अनेकांनी कारवाईपूर्वीच आपला गाशा गुंडाळला. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती. अनेक दिवसांनंतर शहरातील रस्ते मोकळे झाल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले. या कारवाईत सातत्य ठेवावे, अशी मागणी होत आहे.
फोटो : ०५ अतिक्रमण कारवाई
पालिकेच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी भाजी व फळ विक्रेत्यांवर कारवाई केल्याने मंगळवार तळे मार्गाने मोकळा श्वास घेतला.
लोगो : लोकमत फॉलोअप