सातारा : कोरोनाकाळात इतर कामे बंद होती. त्यावेळी रोजगार हमी योजनेची कामे सुरू होती. त्यामुळे मजुरांना रोजगार मिळाला. हातातोंडाची गाठ पडली. शासनाची ही योजना फायदेशीर ठरली असून, सद्य:स्थितीत जिल्ह्यात एक हजार २३९ कामांवर पाच हजार १७९ मजूर कार्यरत आहेत.
मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा फैलाव सुरू झाला. त्यामुळे केंद्र शासनाने संपूर्ण देशातच लॉकडाऊन जाहीर केला होता. सध्या काही प्रमाणात शिथिलता आहे. पण लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवसाय बंद पडले होते. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अशा काळात जिल्ह्यातील हजारो मजुरांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आधार ठरली होती. आजही तशीच स्थिती आहे. सध्या सर्व व्यवसाय सुरू झाले आहेत. तसेच ‘रोहयो’ची कामेही वाढली आहेत.
केंद्र शासनाची ही योजना असून, आर्थिक वर्षात एका कुटुंबाला १०० दिवसांचा रोजगार देण्यात येतो. यापूर्वी रोजगार हमीच्या कामावर असणाऱ्या मजुराला दिवसाला २०६ रुपये दिले जायचे. पण, गेल्यावर्षी एप्रिलपासून मजुरी दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिवसाला २३८ रुपये मजुरांना मिळत आहेत. त्यातच आठ दिवसांत पैसे बँक खात्यावर जमा होतात. परिणामी ही योजना फायदेशीर ठरू लागलीय.
सातारा जिल्ह्यात सध्या ४३९ ग्रामपंचायतींच्या ठिकाणी कामे सुरू आहेत. एक हजार २३९ कामांवर पाच हजार १७९ मजूर काम करतात. यामध्ये माण तालुक्यात सर्वाधिक २३२ कामे सुरू असून, एक हजार १५४ मजूर काम करतात. कऱ्हाड तालुक्यात सध्या १५२ कामांवर ४५२ जण आहेत. पाटण तालुक्यातील २०१ कामांवर ७२७ जण तर फलटणमध्ये १३२ कामे सुरू असून, ६८४ जण काम करत आहेत. कोरेगाव तालुक्यातील ३४ कामांवर २३१ मजूर आहेत. महाबळेश्वर तालुक्यात १२ कामांवर १३१ जण कार्यरत आहेत. सातारा तालुक्यात १०८ कामे सुरू आहेत. येथे ४९५ जण काम करू लागलेत तसेच खंडाळ्यात ९९, वाईत ७४ आणि जावळी तालुक्यात रोजगार हमी योजनेची १३ कामे सुरू आहेत.
रोजगार हमी योजनेंतर्गत सिंंचन विहीर, घरकूल, वृक्ष लागवड, फळबाग लागवड आदी विविध कामे सुरू आहेत. या कामांच्या माध्यमातून मजुरांना आधार मिळत आहे.
फोटो दि.०८ सातारा रोजगार हमी फोटो....
फोटो ओळ : सातारा जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून अनेक प्रकारची कामे सुरू आहेत.