सातारा : ‘पर्ल्स’ कंपनीने जिल्ह्यातील हजारो गोरगरीब ठेवीदारांना शेकडो कोटींचा गंडा घातला असतानाच काही दिवसांपूर्वी कंपनीच्या साताऱ्यातील काही कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे अनेक एजंट घाबरले असून यापैकी काही एजंट गायब झाले आहेत.‘पर्ल्स’चा हजारो कोटींचा घोटाळा समोर आल्यानंतर त्यांची देशभरातील अनेक ठिकाणची कार्यालये बंद झाली आहेत. सातारा येथील बसस्थानक परिसरात असणारे त्यांचे कार्यालयाला कुलूप आहे. येथे जवळपास वीसहून अधिक कर्मचारी आहेत. यापैकी तेरा कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामे दिल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे कंपनी आणि राजीनामे दिलेल्या कर्मचाऱ्यांनीही याविषयी गुप्तता पाळली आहे. एजंटांनी तर केव्हाच सातारा जिल्ह्यातून पाय काढता घेतला आहे. काहींनी आपले मोबाईलही स्वीच आॅफ केले आहेत.सातारा जिल्ह्यात पर्ल्सचे सात हजारांहून अधिक ठेवीदार असून चार हजारांच्या आसपास एजंट आहेत. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार एजंटांची संख्या याच्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘पर्ल्स’मध्ये गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांनावर ही वेळ येणार असल्याची कल्पना काही एजंटांना यापूर्वीच लागली होती, त्यामुळे काहींनी काम थांबवून बचाव करण्याचाही प्रयत्न केला आहे. (प्रतिनिधी)एजंटानी घेतले सोने...जिल्ह्यातील दोनशेहून अधिक ठेवीदारांनी शनिवारी पर्ल्स कंपनीच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. यावेळी असंख्य ठेवीदारांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करत पर्ल्सचा निषेध केला. ठेवीदार असलेल्या उर्मिला कुंभार या महिलेने यावेळी माहिती दिली की, अनेक एजंटानी आमच्याच पैशातून सोने खरेदी केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.ठेवीदार शोधण्याचा कानमंत्र...पर्ल्समध्ये एजंटाचे अनेक ग्रूप असून ते युनिट म्हणून ओळखले जायची. प्रत्येक युनिटला नाव वेगळे आहे. या युनिटच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकारी आठ ते पंधरा दिवसांनी महाबळेश्वर, पाचगणी अथवा अन्य प्रेक्षणीय ठिकाणी बैठक घ्यायचे. या बैठकीला एजंटांना पाचारण केले जायचे. या बैठकीत एजंटांना त्यांचे अनुभव कथन करायला लावायचे त्याचबरोबर ठेवीदार, गुंतवणूकदार कसा शोधायचा याचा कानमंत्र दिला जायचा. यामुळेच ठेवीदारांची संख्या वाढली गेली.
कर्मचाऱ्यांचे राजीनामे अन् शेकडो एजंट पसार
By admin | Updated: November 9, 2014 23:27 IST