सातारा : कोरोना योध्ये म्हणून पेट्रोल पंप कर्मचारी, बँक कर्मचारी, पोस्ट कर्मचारी, एमएसईबीचे कर्मचारी आणि प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रिक मीडियामधील वार्ताहर, पत्रकार, कर्मचारी यांना फ्रन्टलाइन वर्कर या कॅटेगरीमध्ये लसीकरण करण्याबाबतचे निवेदन आज भारतीय जनता पार्टी तर्फे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की पेट्रोल पंप कर्मचारी, बँक कर्मचारी ,पोस्ट कर्मचारी , एमएसईबीचे कर्मचारी आणि प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रिक मीडियामधील वार्ताहर, पत्रकार, कर्मचारी, हे कोरोना च्या पहिल्या लॉकडाऊनपासून घरात बसून न राहता पूर्णपणे रस्त्यावर उतरून काम करत आहेत. लोकांची सेवा करत आहेत, कोणतेही कारण काढून त्यांनी लोकांची कामे करणे थांबविलेले नाही, अनेकांना कोरोनाची बाधा झाली, काही जण त्यात मृत्यू पावले, परंतु तरीही शासकीय आदेश पाळून हे सर्वजण काम करत राहिले आहेत आणि अजूनही काम करत आहेत.
वास्तविक पाहता या सर्वांचा लोकांशी रोज आणि थेट संपर्क येत असतो आणि ज्याप्रमाणे आपण वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांना फ्रन्टलाइन वर्कर या कॅटेगरीमध्ये बसून लसीकरण केले आहे त्याच प्रमाणे , पेट्रोल पंप कर्मचारी, बँक कर्मचारी, पोस्ट कर्मचारी, एमएसईबीचे कर्मचारी आणि प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रिक मीडियामधील वार्ताहर, पत्रकार, कर्मचारी यांना तातडीने लसीकरण करण्याची व्यवस्था करण्यात यावी.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा तालुकाध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, शहर सरचिटणीस विक्रांत भोसले, तालुका सरचिटणीस गणेश पालखे, सातारा युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम बोराटे, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.