वडूज : जिहे-कठापूर योजनेतून खटाव तालुक्यातील ११ गावे वगळण्यात आली नसून तसा कोणी लोकांमध्ये गैरसमज पसरवू नये. तसेच या ११ गावांचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठांच्या माध्यमातून ठोस पाठपुरावा केला जाईल,’ असे मत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नंदकुमार मोरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी प्रा. अर्जुनराव खाडे, प्रा. बंडा गोडसे, माजी सभापती संदीप मांडवे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती विजय काळे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, राजेंद्र कचरे, बाळासाहेब पोळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
नंदकुमार मोरे म्हणाले, ‘खटाव तालुक्यातील पूर्व भागातील लोकांना जिहे-कठापूरचे पाणी मिळणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांसह जे बरोबर येतील त्यांना घेऊन व्यापक चळवळ उभारली जाईल. लवकरच आमदार शशिकांत शिंदे, ज्येष्ठ नेते प्रभाकर देशमुख यांच्या माध्यमातून मंत्री जयंत पाटील यांच्याशी या विषयावर बैठक लावण्यात येणार आहे. खटाव तालुक्यातील सर्व भागाला पाणी मिळणे हे गरजेचे आहे. मात्र या प्रश्नी कोणीही राजकारण करू नये. आमदार शिंदे, मंत्री पाटील यांना तालुक्यात फिरू न देण्याचा इशारा अयोग्य असल्याचेही त्यांनी सांगितले. तर या प्रश्नी सर्व मतभेद विसरून तळमळीने काम करण्याचे आवाहन ही त्यांनी केले.’
यावेळी प्रा. अर्जुनराव खाडे, प्रा. बंडा गोडसे, डॉ. संतोष देशमुख, बाळासाहेब पोळ यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शैलेश वाघमारे, डॉ. प्रकाश पाटोळे, संतोष तारळकर, पोपट पाटील, पोपट जगदाळे, शिवाजी साबळे, शैलेश वाघमारे, विनोद मोहिते, सागर चंदनशिवे यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
-----------------------------------