सातारा : येथील औद्योगिक वसाहतीतील मे. इमर्सन नेटवर्क पॉवर (इं) प्रा. लि. कंपनीतील कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कामगारांच्या प्रश्नावर तोडगा निघेपर्यंत व्यवस्थापनाने कंपनीतील उत्पादन व मशिनरी हलवू नये, अशी ठाम मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. यावर व्यवस्थापनातर्फे अॅड. निर्मल यांनी कामगारांच्या बाजूने सकारात्मक निर्णय घेऊ असे, आश्वासन दिले. पुणे येथील अपर कामगार आयुक्त कार्यालयात इमर्सन कंपनी बंद झाल्याबाबत बैठक झाली. या बैठकीला आमदार शशिकांत शिंदे, सहायक कामगार आयुक्त सु.बा. बागल, शैलेंद्र पोळ, सरकारी कामगार अधिकारी पी. बी. जाधव, व्यवस्थापन प्रतिनिधी आर. एम. निर्मल, कामगार प्रतिनिधी विठ्ठल गोळे, गोरखनाथ नलावडे, अण्णासाहेब कांबळे आदी उपस्थित होते. आमदार शिंदे म्हणाले, ‘इमर्सन कंपनी अचानकपणे बंद करण्यात आलेली आहे. कामगारांच्या भवितव्याचा विचार न करता ही कंपनी बंद केली आहे. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कंपनीने पूर्ववत आपले काम सुरू करावे. कामगारांना नियमित रोजगार उपलब्ध करून द्यावा. व्यवस्थापनाची आर्थिक अडचण असेल तर त्यांनी ले आॅफ द्यावा आणि सहा महिने कारखाना चालवावा. सहा महिन्यात कंपनीचा व्यवसाय वाढल्यास पूर्ववत कामकाज सुरू होईल. कंपनी म्हणते मालाला ३० टक्केच उठाव आहे. तर त्यांनी ५० टक्के कामगारांना कामावर घ्यावे. सर्व कामगार एक-एक महिना आलटून पालटून दरमहा काम करतील. नोकरी गेली तरी कामगार शांततेने निषेध व्यक्त करीत आहेत. व्यवस्थापनाने त्यांच्यावर खोट्या केसेस करू नयेत. योग्य तोडगा निघेपर्यंत कामगार शांततेचाच अवलंब करतील, असे आश्वासनही आमदार शिंदे यांनी यावेळी दिले. (प्रतिनिधी)
तोडगा निघेपर्यंत ‘इमर्सन’मधील मशिनरी हलवू नये : शशिकांत शिंदे
By admin | Updated: May 25, 2015 00:36 IST