फलटण : सासकल (ता. फलटण) ग्रामपंचायतीच्यावतीने चौदाव्या वित्त आयोगातून २०१८-१९ या वर्षांत १ लाख ६५ हजार रुपये रक्कम खर्च करून जुने समाज मंदिर दुरुस्त करण्यात आलेले आहे. समाज मंदिर सुस्थितीत असताना अनावश्यक खर्च करून मागासवर्गीय समाजाच्या निधीचा अपहार झाल्याची तक्रार जनआंदोलन समितीच्यावतीने फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
चौदाव्या वित्त आयोगातून मागासवर्गीय वस्तीमध्ये असणाऱ्या बुद्धविहाराच्या इमारतीच्या दुरुस्तीची मागणी असतानाही ती दुरुस्ती न करता ज्या इमारतींचा समाजाला कोणत्याही सार्वजनिक कामासाठी उपयोग होत नाही, अशा जुन्या समाज मंदिरावर खर्च करून लोकांच्या मागणीकडे कानाडोळा केला आहे.
ज्या समाज मंदिराच्या दुरुस्तीचे काम सासकल ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आलेले आहे, ते त्या समाज मंदिराची दुरुस्ती माजी सरपंच दादासाहेब मुळीक यांच्या काळात करण्यात आली होती. यावर मजबूत असा पत्रा व दगडी इमारत असताना यावरील जुना पत्रा बदलण्यात आला आहे. त्यावर नवीन पद्धतीचा पत्रा टाकण्यात आलेला आहे. या पत्र्याला दोन - तीन ठिकाणी छिद्र पडलेली आहेत. या इमारतीत पॉलिश केलेली शाहबाद फरशी टाकण्यात आलेली आहे. तसेच खिडक्या दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. या इमारतीची गरज नसताना व लोकांची मागणी डावलून या ठिकाणीच खर्च करण्यात आला आहे. यावरील काढण्यात आलेला पत्रा व लाकडी पाखाडी चोरीला गेली आहे. ग्रामपंचायतीचे मात्र त्याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे मागासवर्गीय समाजबांधवांनी फुटलेला पत्रा बदलून देण्याची व बुद्धविहाराच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.
जुन्या समाज मंदिरावर झालेल्या कामाचा फलक लावण्यात आलेला आहे. त्यावरसुद्धा स्पष्ट शब्दांमध्ये असं लिहिलं आहे की, मौजे सासकल येथे समाज मंदिर दुरुस्त करणे व बुद्धविहार समाज मंदिर दुरुस्त करणे, यासाठी १ लाख ६५ हजार रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. परंतु बुद्धविहाराची कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. हे काम २८ जून २०२० रोजी सुरू झाले व २३ ऑगस्ट २०२० रोजी काम पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. या कामाची एक वर्षाचे उत्तरदायित्व असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या जुन्या समाज मंदिरावरील फुटलेला पत्रा तातडीने बदलून द्यावा व बुद्धविहाराच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करून द्यावे, अशी मागासवर्गीय समाज बांधवांनी मागणी केली आहे. ही समाज बांधवांची मागणी पूर्ण न झाल्यास सासकल जनआंदोलन समितीच्यावतीने आंदोलन करून वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी जनआंदोलन समितीचे अध्यक्ष शिवाजीराव मुळीक, सल्लागार भानुदास घोरपडे, अक्षय घोरपडे, उपाध्यक्ष विनायक मदने, विशाल घोरपडे, रोहन घोरपडे, नंदकुमार घोरपडे, सूरज जगताप व ग्रामस्थ उपस्थित होते.