सरकारला मिळणारे उत्पन्न बऱ्याच मार्गातून बंद झाल्यामुळे दारू विक्रीमधून जादा उत्पन्न मिळते, अशी खात्री झाल्याने सरकारने या व्यवसायाला मजबूत करण्याची भूमिका घेतली की काय, असे सर्वसामान्यांना वाटू लागले आहे. शेणोली गावांमध्ये दारूविक्री होऊ नये, यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि संघटना तसेच ग्रामपंचायत प्रयत्न करीत आहे. दोन वर्षांपूर्वी असाच प्रकार निदर्शनास आल्यामुळे सर्व महिला आणि पुरुषांनी एकत्र येऊन आंदोलन केले. प्रशासनाला विविध पातळीवर निवेदने दिली. त्यामुळे गावात दारूचे दुकान चालू होण्याच्या प्रक्रियेला ‘ब्रेक’ लागला. मात्र, पुन्हा दोन वर्षांनंतर या दुकानदाराने डोके वर काढले असून याबाबतीत शासनाने त्यांना परवाना दिल्याचे समजते.
शेणोली गावात दारूचे दुकान चालू होऊ नये, यासाठी सतत विरोध केला जात असताना ग्रामपंचायतीची कोणतीही कागदपत्रे, कोणताही ठराव, महिलांची संमती अशी प्रक्रिया न करता या दारू विक्रेत्यास परवाना दिला कसा, असा प्रश्न निर्माण होत आहे. सरपंच विक्रम कणसे, उपसरपंच संगीता माळी, नारायण शिंगाडे, अशोक कणसे, प्रकाश कणसे, माणिकराव कणसे, चंद्रकांत कणसे, संपत गायकवाड, सुहास कणसे, सुधीर बनसोडे, संभाजी कुंभार, शरद सूर्यवंशी, बाळासाहेब सूर्यवंशी, वैभव कणसे, सागर कणसे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले आहे.
- चौकट
बैठका, चर्चा, सह्यांची मोहीम सुरू
दारूबंदीच्या विरोधात निवेदन दिल्यानंतर प्रशासनाबरोबरच चर्चा करताना अपेक्षित समाधानकारक, सकारात्मक चर्चा न झाल्यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. लोकशाहीच्या माध्यमातून याविरुद्ध आवाज उठवण्याची भूमिका ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीने घेतली असून उभी बाटली आडवी करण्यासाठी कंबर कसली आहे. घरोघरी महिलांच्या सह्या घेणे, चर्चा, बैठका सुरू झाल्या आहेत.
- कोट
शेणोलीत अवैध व्यवसाय चालू नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हे दारूचे दुकान चालू होऊ देणार नाही. गावामध्ये दारूबंदी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. लोकशाहीच्या मार्गातून महिला, युवक, ग्रामस्थांच्या माध्यमातून आम्ही हा लढा यशस्वी करणार आहे.
- विक्रम कणसे,
सरपंच, शेणोली