शिरवळ : किसनवीर आबांच्या नावाने सुरू असलेला कारखाना बंद पडू नये ही सर्वसामान्य शेतकऱ्यांबरोबर आमची धारणा आहे. चंगळवादामुळे कारखाना अडचणीत आला आहे. राज्य शासनाने शेतकरी बांधव अडचणीत येऊ नये याकरिता कारखाना सुरू करण्यासाठी ३० कोटी रुपये भागभांडवल दिले म्हणून गेल्यावर्षी उशिराने का होईना कारखाना सुरू होऊ शकला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाली असून कारखाना वाचविण्यासाठी काय करता येईल, याचा अभ्यास करून सांगतो असे त्यांनी सांगितले आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताकरिता व किसनवीर आबांच्या नावाचा कारखाना वाचविण्याकरिता कारखान्याची निवडणूक लढविण्याचाच एल्गार वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांनी केला आहे.
शिरवळ (ता. खंडाळा) येथील न्यू कॉलनी याठिकाणी आमदार मकरंद पाटील यांच्या आमदार फंडातून समाजमंदिर व सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांच्या जिल्हा परिषद सेस फंडातून सुशोभिकरण करण्यात आलेल्या सत्यज्योत तरुण मंडळाच्या समाज मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले होते.
आमदार मकरंद पाटील म्हणाले, किसनवीर कारखान्यासमोरील अडचणी आम्ही पाहत आहोत. त्या सोडविण्यासाठी प्रयत्नदेखील करत आहोत. त्यामुळे आम्ही शांत आहोत असे कोणीही समजू नये. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्हांला आता पुढाकार घ्यावाच लागणार आहे. याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा झाली असून पुढील आठवड्यात बैठक होण्याचीही शक्यता आहे. या बैठकीवेळी किसनवीर कारखान्याबाबत निर्णय होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी उदय कबुले म्हणाले, आमदार मकरंद पाटील यांच्या माध्यमातून शिरवळमध्ये विकासाचा डोंगर उभा करता आला आहे. सध्या गावामध्ये बिनबुडाचे पुढारी गावात वावरत असून त्यांचे सरकार असताना शिरवळसाठी एक रुपयाही आणता आला नाही ते आता विकासाची वल्गना करीत आहेत अशी जोरदार टीका त्यांनी केली.
याप्रसंगी खंडाळा पंचायत समिती सभापती राजेंद्र तांबे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष आदेश भापकर, शिरवळ ग्रामपंचायत सदस्य दिलीप गुंजवटे, विकास तांबे, सचिन राऊत, रिजवाना काझी, आशा कारळे, प्रकाश परखंदे, शिरवळ शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष चंद्रकांत मगर, राष्ट्रवादी युवक शिरवळ शहराध्यक्ष समीर काझी, बाळासाहेब जाधव, अमृत पिसाळ, ताहेर काझी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी राजेंद्र तांबे, आदेश भापकर, अजय चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते बालसत्यज्योत तरुण मंडळाच्या समाज मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. मोहन कासुर्डे यांनी आभार मानले.