पिंपोडे बुद्रुक : ‘गावाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजविणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सक्षमीकरणासाठी आपण कायम प्रयत्नशील असून, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामे पार पाडण्यासाठी जनतेने राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीशी एकनिष्ठ राहून पक्ष बळकट करावा,’ असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. रणदुल्लाबाद (ता. कोरेगाव) येथे नूतन ग्रामपंचायत इमारत वास्तू पूजन व विविध विकासकामांचे भूमिपूजन समारंभप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आ. दीपक चव्हाण, यशवंतराव माने व जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
रामराजे म्हणाले, ‘रणदुल्लाबाद, सोळशी व नायगावला नांदवळ धरणातून उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्यासाठी लवकरच मंत्रालयात बैठक होईल.’ विठ्ठल मंदिराच्या सभामंडपासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन आ. दीपक चव्हाण यांनी यावेळी दिले. वयाची ऐंशी पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच कोविड योद्धे, परिसरातील सरपंच, पोलीस कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, आरोग्य अधिकारी यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
दरम्यान, यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, कृषी सभापती मंगेश धुमाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश धुमाळ, पंचायत समिती सभापती राजाभाऊ जगदाळे, उपसभापती संजय साळुंखे, सरपंच मंगेश जगताप, गजानन जगताप, गोवर्धन जगताप, सुरेश देशमुख, सपना ढमाळ, नीता सोनवणे यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. जितेंद्र जगताप यांनी प्रास्ताविक केले. ढमाळ व विलास जगताप यांनी सूत्रसंचालन केले.