महाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये गेल्या महिन्यात अतिवृष्टी झाल्यामुळे अंबेनळी घाटात ठिकठिकाणी दरडी पडल्या. रस्ता खचल्याने प्रतापगड परिसरातील बावीस गावांचा संपर्क तुटलेला होता. पोलादपूर ते महाबळेश्वर घाटामध्ये जवळपास २७ ठिकाणी दरड पडल्या. अनेक रस्तेच्या रस्ते वाहून गेले होते. त्यातच शनिवारी दुधोशी बसथांब्याजवळ अंबेनळी घाटामध्ये भली मोठी दरड पडली. यामुळे घाटा खालील राहणाऱ्या गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अंबेनळी घाट परिसरात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर अजूनही अंबेनळी घाट वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. आजअखेर रस्त्यावरील मोठ्या प्रमाणावर आलेल्या दरड जेसीबी व पोकलनद्वारे हटवण्याचे काम
सुरू आहे. यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबेनळी घाट पूर्णपणे धोकादायक झाला आहे.
डोंगर कड्यातून मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्याने त्यांच्या बाजूची जागाही ठिसूळ झाली आहे. यामुळे दरड सतत पडत राहतील, अशी शंका स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
सतत पडणाऱ्या दरडींवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दुधोशी फाट्यावरील भागात शनिवारी मोठ्या प्रमाणात दरड कोसळली. यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामधून आंबेनळी घाट कधी व कसा सुरू होणार, यात शंकाच व्यक्त होत आहे.