शेखर जाधव - वडूज -खटाव तालुक्यातील पूर्व भागाकडे असणारे एनकूळ हे गाव पूर्वीपासून विविध कारणाने नेहमीच चर्चेत असायचे तर येथील राजकीय मतभेदामुळे आजअखेर या गावचा विकास रखडला. माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी हे गाव दत्तक घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे ‘थोडी खुशी, थोडा गम’ अशी अवस्था एनकुळकरांची झाली आहे.या गावाला रस्ताच नव्हता; परंतु १९७२ च्या दुष्काळात तत्कालीन मंत्री बबनराव ढाकणे यांच्या भेटीनंतर तातडीने रस्ता झाला. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात दळण-वळण सुरू झाले. पडलेल्या पावसाच्या पाण्यावर शेती व्यवसाय सुरू झाला. आर्थिक सुबत्ता येऊ लागल्याने येथील शैक्षणिक दर्जा सुधारला. २०१० मध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्ता झाला.या गावातील ८० टक्के लोक सुशिक्षित व नोकरीमध्ये असले तरी विचारांची देवाण-घेवाण राजकीय गटातटांत विभागल्यामुळे बहुतांशी विकास खुंटला आहे. येथील ग्रामदैवत श्रीनाथाची यात्रा कोजागिरी पौर्णिमेला होते. पूर्वी या यात्रेला मोठे स्वरूप होते; परंतु, राजकीय मतभेदामुळे येथे तीन पार्टीची यात्रा भरत होती. गावची लोकसंख्या सुमारे ५००० असून २३८० मतदारांमध्ये पुरुष ११७८ तर स्त्रिया ११९५ आहेत. गावचे एकूण क्षेत्र ९९१ हेक्टर असून यामध्ये ५४० हेक्टर बागायत क्षेत्र तर ४५१ जिरायत क्षेत्र आहे. येथील शेती पावसावर अवलंबून आहे. येथे ८० टक्के वंजारी समाज असून इतर समाज २० टक्के आहे. उन्हाळा सुरू होताच प्राधान्याने टँकर सुरू होणारे जिल्ह्यातील प्रथम गाव म्हणजे एनकूळ होय. स्वातंत्र्यपूर्व काळापासून खटाव-माणच्या पाणीप्रश्नावर आजअखेर निवडणुका झाल्या; परंतु पूर्ण क्षमतेने पाणी काही आले नाही. माढा लोकसभा मतदारसंघात गाव समाविष्ट आहे. येथील मूलभूत गरजा, समस्या व पाणीप्रश्न सुटला नाही. राज्यसभेचे खासदार शरद पवार यांना हेच गाव दत्तक का घ्यावे असे वाटले? असा यक्ष प्रश्न तालुक्यातील जनता व एनकुळकरांना पडला आहे. कारण नेहमीच राजकीय धक्के देणारे शरद पवार यांची यामागची राजकीय खेळी काय आहे का ? तर्क-वितर्कांना ऊत आला आहे. काहीही असले तरी गावचा विकास होणार आहे.२ हजार ३८० मतदार गावची एकूण लोकसंख्या ५ हजार असून २ हजार ३८० मतदार आहेत. यामध्ये पुरुष १ हजार १७८ तर महिला मतदार १ हजार १९५ आहेत. गावात ८० टक्के वंजारी समाज असून इतर समाज घटक २० टक्के आहेत. या ठिकाणी पुरुषांपेक्षा महिलांचीच संख्या अधिक आहे.प्रशासकीय अधिकाऱ्यांचं गावएनकूळ हे दुष्काळी माण तालुक्यात येते. येथे बागायती शेती पिकत नसली तरी शिक्षणाचे महत्त्व येथील लोकांनी जाणलं आहे. एनकूळ गावातील योगेश खरमाटे हे कोल्हापूर येथे तहसीलदार आहेत. तर मध्यप्रदेश केडरमध्ये जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असणारे डॉ. सुदाम खाडे हे याच गावचे. दिल्ली सर्वाेच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत असणारे अॅड. दादासाहेब खरमाटेही याच गावचे.दृष्टिक्षेपात गावलोकसंख्या : २,५४४ स्त्रिया : १,२८३पुरुष : १,२६१मतदार : २,३८०प्रभाग : ३उत्पन्नाचे साधन : विविध प्रकारे कर व शासकीय योजनाप्रमुख पिके : ज्वारी, बाजरी, बटाटा, कांदा.तालुक्याच्या मुख्यालयापासून : १७ किलोमीटरवाहतुकीचे साधन : एसटीकर्मवीरांची शैक्षणिक परंपराकर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९५१ साली एनकूळ येथे येऊन निवासी शाळा सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. त्याला एनकूळकरांनी चांगला प्रतिसाद दिला. १०१ बैलजोडी गाड्यांमधून सवाद्य कर्मवीर अण्णांची मिरवणूक काढली. कायम दुष्काळी असणाऱ्या भागातील भावी पिढी शैक्षणिकदृष्ट्या कणखर बनेल या शुध्द हेतूने अण्णांनी खटाव-माण तालुक्यातील ५० किलोमीटर अंतरावरील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी निवासी शाळा १९५२ सुरू केली. रयत शिक्षण संस्थेचे महर्षी शिंदे विद्यालय, एनकूळ येथे सुरू झाले. तालुक्यातील ही पहिलीच शाळा. या शाळेमध्ये म्हसवड, कलेढोण आदी परिसरातून विद्यार्थी शिक्षणासाठी दाखल झाले. खटाव तालुक्यात वडूज व एनकूळ येथेच शाळा असल्यामुळे एनकूळ या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रमाण जादा होते. त्याच काळात कर्मवीर अण्णांनी टाटा ट्रस्टला हे गाव दत्तक घेण्याची विनंती केली. ९० टक्के सुशिक्षित कर्मवीरांनी दुष्काळी गावात शिक्षणाची गंगा पोहोचविली अन् गाव शिक्षणाच्या बाबतीत सुपीक बनलं. गावात ९० टक्के लोक सुशिक्षित आहेत. तर नोकरी करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.ग्रामस्थांच्या अपेक्षाएनकूळ गावात अनेक योजना प्रलंबित आहेत. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. हे गाव दत्तक घेतल्याने ग्रामस्थांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यामध्ये स्मशानभूमी, नळ योजना, ग्रंथालय, वाचनालय, दिवाबत्ती, व्यायामशाळा, सांस्कृतिक भवन, अंतर्गत रस्ते, गटार व्यवस्था, उर्वरित स्वच्छतागृहाची कामे पूर्ण व्हावीत. पाटलोट क्षेत्राची कामे, सार्वजनिक स्वच्छतागृह, सिमेंट बंधारा बांधल्यास अनेक प्रश्न निकाली निघतील.जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते व आमदार प्रभाकर घार्गे यांच्या शिफारसीनुसार शरद पवार यांनी हे गाव दत्तक घेतले आहे. यामुळे एनकुळ गावचा सर्वांगीण विकास होऊन राज्यात हे गाव आदर्श म्हणून ओळखले जाईल.- प्रा. अर्जुन खाडे, संचालक, जिल्हा बँकदत्तक योजना स्वागतार्ह आहे. दुष्काळी भागातील कायम वंचित असणारे गाव दत्तक घेऊन न्याय देण्याची भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजना, शाळेची दुरवस्था आदींसह कामे मार्गी लागण्याची अपेक्षा आहेत.- मा. ए. खाडे, माजी चेअरमन, प्राथमिक शिक्षक सहकारी बँक
एनकूळ पुसणार दुष्काळी कलंक
By admin | Updated: November 11, 2014 23:18 IST