सातारा : दुष्काळग्रस्त गावांतील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याने सातारा जिल्ह्यातील दिवड, दिडवाघवाडी व पानवण (ता. माण) या तीन गावांतील शेतकऱ्यांना ७१ लाखांची आर्थिक मदत मिळणार आहे.राज्यभरातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दोन हजार कोटींची मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने मागील मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या गावांतील शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत तहसीलदारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. पुणे विभागासाठी साडेसात कोटींची मदत मिळणार आहे. सातारा जिल्हा हा पुणे विभागात येत असल्याने यापैकी ७१ लाख माण तालुक्यातील तीन दुष्काळग्रस्त गावांना मिळणार आहेत. मात्र, यासाठी प्रधानमंत्री जनधन योजनेचे बँक खाते असणे आवश्यक आहे. ही मदत अल्प व अत्यल्प भूधारकांना त्यांच्या पूर्ण क्षेत्रासाठी दिली जाणार आहे. बहुभूधारकांना एक हेक्टरपर्यंत मदत दिली जाईल. जिल्ह्यामध्ये माण, खटाव, फलटण, खंडाळा व कोरेगाव या तालुक्यांना दुष्काळाचा मोठा फटका बसतो. माण तालुक्यातील दहिवडी परिसरात महाराष्ट्रातील सर्वात कमी पाऊस पडतो. त्यामुळे शेतीसह जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न नेहमीच भेडसावतो. पिण्याच्या पाण्याचे नेहमी दुर्भिक्ष असल्याने प्रशासनाच्या वतीने टँकर पुरवठा करण्यात येतो. ही गंभीर परिस्थिती असतानाही या तालुक्यांतील शेतकऱ्यांवर नेहमी अन्याय होत आला आहे. सरकार बदलले तरी या तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या पाठीमागे लागलेली साडेसाती थांबत नाही. (प्रतिनिधी)शेतकरी २२४७; मदत ३१६० रुपयेमाण तालुक्यातील दिवड, दिडवाघवाडी व पानवण या गावांतील १५४२ हेक्टर क्षेत्र पावसाअभावी मागील खरीप हंगामात पेरणीविना राहिले होते. या तीन गावांतील २२४७ शेतकऱ्यांचे या हंगामात नुकसान झाले. शासनातर्फे ३ हजार १६० प्रती शेतकरी अशी मदतीचे वाटप करण्यात येणार आहे.शासनाने केलेली ही मदत तुटपुंजी असल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.या मदतीचे वाटप संबंधित तहसील कार्यालयामार्फत केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.
दुष्काळाची मदत तीन गावांनाच
By admin | Updated: January 21, 2015 23:52 IST