सातारा : डॉ. गेल ऑम्व्हेट यांना आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्रातील विविध परिवर्तनवादी पक्ष, स्त्री- मुक्ती संघटना, प्राध्यापक, संशोधक, अभ्यासक आणि विविध चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते यांची आदरांजली सभा रविवार दि. ५ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता राजारामबापू पाटील सभाग्रह ‘पदयात्री’ एसटी स्टँडजवळ कासेगाव येथे आयोजित केली आहे.
या आदरांजली सभेत डॉ. गेल ऑम्व्हेट यांच्यावर डॉ. भारत पाटणकर यांनी लिहिलेल्या कवितांचा आणि मुक्तशब्दचे प्रकाशक येशू पाटील यांनी प्रकाशित केलेला ‘सखी’ हा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे. याचबरोबर मधुश्री प्रकाशनचे शरद अष्टेकर यांनी डॉ. गेल ऑम्व्हेट यांच्या ‘आंबेडकर टुवर्डस् एनलायटंड इंडिया’ या इंग्रजी ग्रंथाचे ‘आंबेडकर- प्रबुद्ध भारताच्या दिशेने’ हा मराठीत भाषांतरित केलेला ग्रंथ सुद्धा प्रकाशित होणार आहे.
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या व धोरण समितीच्या सदस्या, बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या व स्त्री-मुक्तीवादी विचारांची, संत साहित्याची आणि वारकरी तत्त्वज्ञानाची अभ्यासपूर्ण अशी नव्या पद्धतीची मांडणी करून समाजापुढे आणणाऱ्या जेष्ठ संशोधक -लेखिका, स्त्री मुक्ती चळवळ आणि परित्यक्ता स्त्रियांची चळवळ, आदिवासी चळवळीमध्ये पायाला भिंगरी लावून झपाटल्यासारखे काम करणाऱ्या विचारवंत कार्यकर्त्या गेल ऑम्व्हेट यांचे तारीख २५ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.