सुशीला सुनील शिंदे (वय ३५, रा. विमानतळ, ता. कऱ्हाड) व विराज निवास गायकवाड (२ वर्षे) अशी खून झालेल्यांची नावे आहेत, तर आरोपी अरविंद सुरवसे हा पसार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ येथे सुशिला शिंदे ही महिला तिच्या आईसमवेत वास्तव्यास होती. तेथेच सुशिलाच्या बहिणीचा दोन वर्षाचा मुलगा विराज हाही राहण्यास आला होता. शनिवारी सुशिला ही भाचा विराजला घेऊन घरात कोणाला काहीही न सांगता बाहेर पडली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत ती घरी आली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी याबाबत विराजच्या अपहरणाची तक्रार नोंदवून घेऊन सुशिला व अरविंद सुरवसे या दोघांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पोलीस तपास करीत असतानाच सोमवारी वारूंजी फाटा येथे अरविंद राहत असलेल्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. मात्र, गटार तुंबली असावी, असा समज झाल्यामुळे नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, मंगळवारी दुर्गंधी जास्तच येऊ लागल्याने तसेच खोलीत माशा घोंगावत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे संशय येऊन नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खोलीचा दरवाजा उघडला असता, खोलीत सुशिला व विराजचा मृतदेह आढळून आला. सुशिलाच्या गळ्यावर धारदार शस्त्राचा वार दिसून येत होता. मात्र, मृतदेह सडल्यामुळे शवविच्छेदनाशिवाय मृत्यूची वेळ आणि कारण स्पष्ट करता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अनैतिक संबंधातून अरविंद सुरवसे याने सुशिला व विराजचा खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सांगितले.
- चौकट
मृतदेह सुटकेसमध्ये कोंबण्याचा प्रयत्न
खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आरोपीने सुशिला व विराजचा मृतदेह कापडी सुटकेसमध्ये कोंबून इतरत्र नेण्याचा प्रयत्न केल्याचे घटनास्थळावरून पोलिसांना दिसून आले. सुशिलाचा मृतदेह सुटकेसमध्ये कोंबला होता मात्र, तो बसत नसल्यामुळे आरोपीने मृतदेह खोलीतच सोडून पोबारा केल्याचे पोलिसांनी सांगितले.