सातारा : काँग्रेसतर्फे आयोजित स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ ‘व्यर्थ न हो बलिदान.... चलो बचाए संविधान,’ या अभियानाचा मोठा कार्यक्रम करून जिल्ह्याचा नावलौकिक देशभर करूया, असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केले.
वडूज येथे ९ सप्टेंबरला होणाऱ्या हुतात्मा दिनानिमित्त ‘व्यर्थ न हो बलिदान.... चलो बचाए संविधान,’ या अभियानांतर्गत कार्यक्रम सातारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक येथे झाली. अध्यक्षस्थानी डॉ. सुरेशराव जाधव होते.
आमदार चव्हाण म्हणाले की, या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यातील व देशातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्वातंत्र्याचा इतिहास व सातारा जिल्ह्याचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान तरुण पिढीला समजण्यासाठी काँग्रेसकडून देशभर या कार्यक्रमाचे वर्षभर आयोजन केले आहे. त्यासाठी आपण सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी करूया, असे त्यांनी शेवटी सांगितले. हा कार्यक्रम वडूज येथे होणार असून, त्याची सर्व जबाबदारी स्वागताध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी घेतली आहे.
या बैठकीला ॲड. उदयसिंह पाटील, विजयराव कणसे, अजित पाटील-चिखलीकर, हिंदुराव पाटील, अशोकराव गोडसे, राजेंद्र शेलार, प्रदीप जाधव, मनोहर शिंदे, रजनीताई पवार, धनश्रीताई महाडिक, मनोजकुमार तपासे, झाकीर पठाण तपासे, नरेश देसाई, अन्वर पाशाखान, संदीप चव्हाण, ॲड. धनावडे, आदी तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, सातारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला; तर नवनियुक्त जिल्हा नियोजन सदस्य ॲड. विजयराव कणसे, हिंदुराव पाटील, अशोकराव गोडसे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी ॲड. उदयसिंह पाटील, कार्यकारी समिती सदस्यपदी अजितराव पाटील, चिटणीसपदी रणजितसिंह देशमुख, राजेंद्र शेलार, प्रदीप जाधव यांचा सत्कार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
फोटो नेम : ३१काँग्रेस
फोटो ओळ : सातारा येथे आयोजित केलेल्या काँग्रेसच्या बैठकीत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.