सातारा : शहरातील आरोग्य यंत्रणेने कोरोनावर लक्ष केंद्रीत केलेले असतानाच, डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत आहे. अधिकाऱ्यांनी याबाबतीत हयगय न करता तातडीने उपाययोजना कराव्यात. डेंग्यूविषयी प्रबोधन करावे, असे आवाहन माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी केले. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आरोग्य रक्षक औषधांचे वाटप करण्यात आले.
एडिस इजिप्टी डासांचा प्रादुर्भाव जिल्ह्यात आणि शहरात वाढत असून, डेंग्यूची लागण सातारा शहरातही अनेकांना झाली आहे. कोरोनाच्या धामधुमीत डेंग्यूच्या फैलावाकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी मागणी करण्यासाठी राजेशिर्के यांनी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अश्विनी जंगम यांची भेट घेतली. डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती आणि घ्यावयाची काळजी याविषयी प्रबोधन करण्याबरोबरच रुग्णांच्या देखभालीसाठी यंत्रणा सक्षम करण्यासाठी गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाकडून नगरपालिकेशी संपर्क साधण्यात आलेला आहे. पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना व मार्गदर्शन देण्यात येत आहे, असे डॉ. जंगम यांनी सांगितले. शरीराला जीवनसत्त्वाचा पुरवठा करणाऱ्या गोळ्या, शरीराचे निर्जलीकरण टाळण्यासाठी ओआरएस आणि अंगदुखी गोळ्या अशा कीटचे वाटप सुहास राजेशिर्के यांच्यातर्फे हिवताप कार्यालयातील कर्मचाऱ्यांना करण्यात आले.
फोटो : २४ सुहास राजेशिर्के
सातारा शहरातील डेंग्यू परिस्थितीबाबत सुहास राजेशिर्के यांनी डॉ. अश्विनी जंगम यांच्याशी चर्चा केली.