पाटण : ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा नाही; मात्र मुख्यमंत्री कसा असतो, हे मी दोन महिन्यांनंतर दाखवितो,’ असे प्रतिपादन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केले.मरळी (ता. पाटण) येथे उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दिवाकर रावते, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार शंभुराजे देसाई, जिल्हाप्रमुख हर्षद कदम, नंदकुमार घाडगे, सभापती वनिता कारंडे उपस्थित होत्या.ठाकरे म्हणाले, ‘महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यांत मला आनंद व सुख बघायचे आहे. तेव्हा राज्यात महायुतीची सत्ता आल्यास देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर नेणार आहे. दोन महिन्यांनंतर मुख्यमंत्री कसा असतो, हे दाखवून देणार आहे. ‘घराघरांत पोलीस दिले तरी महिला सुरक्षित राहू शकत नाहीत,’ असे विधान गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केले होते. आपल्याच पोलिसांविषयी अविश्वास दाखविणारा गृहमंत्री आजवर कधी पाहिला नव्हता. महिला सुरक्षित असल्याचा दावा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून केला जात आहे. मात्र, आघाडी शासनाच्या मंत्र्यांनी पोलीस बंदोबस्ताशिवाय पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात फिरून दाखवावे. पन्नास वर्षांच्या काळात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मराठी माणसांवर अत्याचार केला आहे. सीमाप्रश्न म्हणजे कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आहे. सीमाभागातील कोवळी मुले मला कोल्हापूरमध्ये भेटली होती. ‘आम्हाला मराठी बोलू दिले जात नाही,’ अशी तक्रार त्यांनी केली होती. तेव्हा मी त्यांना सांगितले की, दोन महिने थांबा, मराठी मुख्यमंत्री कसा असतो, हे दाखवीन.’ (प्रतिनिधी)मरळी (ता. पाटण) येथे शुक्रवारी झालेल्या सभेत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, शंभुराज देसाई, आमदार दिवाकर रावते, आदी उपस्थित होते.बाळासाहेब देसार्इंच्या आठवणींना उजाळा‘लोकनेते बाळासाहेब देसाई यांना मी लहानपणी पाहिल्याचे आठवते. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मला सांगायचे की, ‘मंत्री असावा तर बाळासाहेब देसार्इंसारखा करारी. बोलतो ते करणारच.’ त्यांची प्रशासनावर जरब होती,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाषणात आठवणींना उजाळा दिला.
मुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही : उद्धव
By admin | Updated: August 22, 2014 22:07 IST