दहिवडी : ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा,’ असे आवाहन दहिवडीचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी केले.
दहिवडी येथे दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष धनाजी जाधव, नायब तहसीलदार विलास करे, श्रीशैल्य वट्ट, तुषार पोळ, नगरसेवक प्रशांत शिंदे उपस्थित होते.
राजकुमार भुजबळ म्हणाले, ‘सर्वांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा. या काळात कुठल्याही मिरवणुका होणार नाहीत. शक्य असल्यास ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबवावी. प्रशासनाच्या अटी व शर्तीनुसार गणेशोत्सव साजरा करावा. प्रत्येकांनी आपले स्वयंसेवक गणपती जवळ ठेवावेत. सोशल डिस्टन्स, सुरक्षा याची काळजी घ्यावी, आवश्यक ते परवाने घ्यावेत. विनाकारण गर्दी करू नये. खर्चाचा अपव्यय टाळून विधायक काम करावे. यावेळी २०२० चे गणेशोत्सव कालावधीत ज्या मंडळांनी रक्तदान, वृक्ष लागवड यांसारखे कार्यक्रम राबविले, अशा बालाजी गणेश मंडळ, दहिवडी, भैरवनाथ गणेशोत्सव मंडळ, बिदाल, सार्वजनिक एक गाव एक गणपती गणेशोत्सव मंडळ, नरवणे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मार्डी, माण गर्जना गणेशोत्सव मंडळ, गोंदवले बुद्रुक, आझाद गणेशोत्सव मंडळ, दहिवडी या मंडळांचा मानपत्र, शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
फोटो : ०२दहिवडी
दहिवडी येथे आयोजित गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी सूचना केल्या. यावेळी नगराध्यक्ष धनाजी जाधव, नायब तहसीलदार विलास करे उपस्थित होते. (छाया : नवनाथ जगदाळे)