वाई : गतवर्षी मोठ्या प्रमाणावर सामाजिक संस्था मदत करत होत्या, पण यावर्षी सर्वांची अवस्था अवघड आहे. ही बाब लक्षात घेऊन घासातील घास देण्याचे काम काही सामाजिक संस्था करताना दिसत आहेत.
केदारेश्वर स्वयंसेवी संस्था, फणसेवाडी- नांदगणे यांच्या वतीने बलकवडी धरणाशेजारील कातकरी वस्तीमधील १५ कुटुंबांना अन्य गावांतील निराधार महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे संकट असून अगोदरच वर्षभर नागरिक हैराण झाले आहेत. अशातच कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मजुरी करणारे, हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होण्याची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेऊन केदारेश्वर स्वयंसेवी संस्थेतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यामध्ये पाच किलो गहू, पाच किलो तांदूळ, मूगडाळ, साखर, चहापावडर, बिस्किटे आदी वस्तू सामाजिक अंतर राखून व नियम पाळून वाटप करण्यात आल्या.
संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र फणसे, खजिनदार संजय फणसे, ग्रामपंचायत सदस्य सखाराम फणसे, माजी सरपंच बबन जंगम, सहदेव फणसे, अभिजित फणसे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सहदेव फणसे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी सुनील फणसे, राजेंद्र गायकवाड, रोहन व आदर्श फणसे उपस्थित होते.