सातारा : ‘स्वच्छ व सुंदर सातारा’ ही संकल्पना रुजवणाऱ्या सातारा शहरात अनधिकृत फ्लेक्स बोर्डची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा फ्लेक्स बोर्डमुळे शहराचे सौंदर्य बकाल होऊ लागले आहे. पालिकेला चुना लावून मनमानी पद्धतीने फ्लेक्स लावणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करणे गरजेचे बनले आहे.
शहरात फ्लेक्स बोर्ड अथवा जाहिरात फलक लावायचे झाल्यास त्यासाठी पालिका प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, काही जण खासगी इमारतींवर, तर काही जण सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना फ्लेक्स बोर्ड लावतात. अशा फ्लेक्स बोर्डची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, शहराचे सौंदर्य बकाल तर होऊ लागले आहे, शिवाय प्रशासनालादेखील आर्थिक भुर्दंड बसत आहे. पालिकेने आजवर अनेकदा असे फ्लेक्स बोर्ड जप्त केले आहेत; परंतु कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून मोठी कारवाई झाली नाही. त्यामुळे फुकट्या जाहिरातदारांची संख्या शहरात वाढली असून, पालिकेच्या कराला कात्री लावणाऱ्यांवर आता प्रशासनालाच कारवाई करावी लागणार आहे.
(चौकट)
या ठिकाणांकडे लक्ष कोण देणार?
- सातारा शहरातील राजवाडा, मोती चौक, खणआळी, राजपथ या ठिकाणी जागोजागी फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले आहेत.
- याशिवाय तहसील कार्यालय, बसस्थानक परिसर, गोडोली, कोडोली, शाहूनगर या त्रिशंकू भागांतही अनधिकृत फ्लेक्स बोर्डची संख्या अधिक आहे.
(चौकट)
वर्षभरापासून कारवाई नाही
कोरोनामुळे उद्योग, व्यवसाय, बाजारपेठा बंद होत्या. निर्बंध शिथिल झाल्यानंतर बाजारपेठ सुरू झाली. यानंतर गेल्या तीन-चार महिन्यांपासून शहरात फ्लेक्स बोर्डची संख्या वाढत चालली आहे. पालिकेला गेल्या वर्षभरापासून ठोस कारवाई करता न आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पालिकेने सध्या अतिक्रमणांवर कारवाई बडगा उगारला आहे. त्याच धर्तीवर फुकट्या जाहिरातदारांवरदेखील कारवाई करणे गरजेचे आहे.
(चौकट)
..तर गुन्हा दाखल
- पालिकेच्या परवानगीने सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावणे ही प्रशासनाची एकप्रकारे फसवणूक आहे. असे कृत्य करणाऱ्यांवर प्रशासन दंडात्मक कारवाई करू शकते. वारंवार असाच प्रकार घडत राहिल्यास संबंधितांवर गुन्हादेखील दाखल केला जाऊ शकतो.
(कोट)
पालिका कारवाईत कोणतीही कसूर ठेवत नाही, मग अतिक्रमण असो किंवा अनधिकृत फ्लेक्स बोर्ड. प्रशासनाला कोरोनामुळे कारवाई करता आली नाही. मात्र, आता पालिकेचा कर बुडवून बिनदिक्कतपणे फ्लेक्स लावणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
- प्रशांत निकम, अतिक्रमण विभागप्रमुख