शेंद्रे : ‘अलिकडच्या काळात वाचनाचे महत्त्व कमी होताना दिसत आहे. पुस्तके विस्मृतीत जात आहेत. या पार्श्वभूमीवर वाचनालय सुरू करण्याचा उपक्रम हा वाचनसंस्कृतीला दिशा देणारा आहे,’ असे मत गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी व्यक्त केले.
कुमठे, ता. सातारा येथील आंबेडकर भवनात सुरू करण्यात आलेल्या वाचनालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास सरपंच रामचंद्र्र तावरे, पोलीसपाटील सुरेंद्र देशपांडे, प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष अनिल चव्हाण, प्रवीण क्षीरसागर, तानाजी सराटे, शिवाजी भोसले, शशिकांत घाडगे, सागर नडे, तानाजी कुंभार, ग्रामसेवक विजय जाधव उपस्थित होते.
संजय धुमाळ म्हणाले, ‘माणसाच्या आयुष्यात वाचनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वाचनामुळे माणसाचे अनुभवविश्व विस्तारते. ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. नवनव्या गोष्टींचे ज्ञान मिळते. वाढदिवसानिमित्त अवास्तव खर्च करण्यापेक्षा पुस्तक दान देण्याची संकल्पना तरुण युवकांत रुजावी. त्यांनी वाचनाची आवड आत्मसात करावी. स्पर्धा परीक्षेची तयारी करावी.’
चेतन तोडकर यांनी आपल्या मनोगतात वाचनालय निर्मितीचा हेतू स्पष्ट केला. रामदास वाघमारे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डोळहिरा शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष राजेंद्र तोडकर, प्रवीण तोडकर, अनिल वाघमारे, युवराज सावळे, नितीन वाघमारे, बबन तोडकर, विलास सावळे, सुप्रिया वाघमारे तसेच महिला मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
फोटो : ०५ सागर नावडकर
कुमठे, ता. सातारा येथील वाचनालयाचे उद्घाटन संजय धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते. (छाया : सागर नावडकर)