सातारा : जात, वर्ग, लिंग, वंश यापलीकडे जाऊन समृध्द आणि प्रबुध्द भारत घडविण्याचे स्वप्न स्वामी विवेकानंदांचे होते. यासाठी ‘उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य झाल्याशिवाय थांबू नका’, अशी आर्त साद ते भारतीय युवकांना घालत होते. न्याय, नीती, समता, बंधुता आणि विज्ञाननिष्ठता ही त्यांची विचारदृष्टी होती; परंतु इथल्या धर्ममार्तंडानी विवेकानंदांना धर्माच्या वर्तुळात बंदिस्त करुन त्यांचे सांस्कृतिक अपहरण केले असे परखड मत साहित्यिक अरुण जावळे यांनी व्यक्त केले.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित संत तुकाराम हायस्कूल, कऱ्हाड येथे विवेकानंद जयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साहित्यिक अरुण जावळे बोलत होते. यावेळी हायस्कूलचे प्रभारी प्राचार्य पी. ए. कुंभार, श्रीधर सवाखंडे, पी. एम. काशीद यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी विवेकानंदांच्या प्रतिमेला साहित्यिक अरुण जावळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ज्ञानशिदोरी या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यादरम्यान काही विद्यार्थ्यांना ग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कारही केला गेला.
अरुण जावळे पुढे म्हणाले, विवेकानंद भारतीय युवकांचे आयडॉल आहेत. त्यामुळे तरुणांच्यापुढे खरेखुरे विवेकानंद जाणे गरजेचे आहे. विवेकानंदांनी नवभारताच्या नवनिर्माणासाठी का ध्यास घेतला होता याच्या मुळाशी आणि तळाशी आजच्या तरुणाईने जायला हवे. तसे जर मार्गक्रमण झाले तर निकोप आणि आदर्श भारतीय समाजव्यवस्था निर्माण करणे सहज शक्य होईल.
प्रभारी प्राचार्य पी. ए. कुंभार यांनी विवेकानंदांचा आदर्श घेऊन युवा पिढीने घडले पाहिजे असे सांगत विवेकानंद जयंती सप्ताहापाठीमागचा उद्देश स्पष्ट केला. श्रुती रघुनाथ म्हेत्रे आणि त्रिवेणी सचिन चव्हाण या विद्यार्थ्यांनी विवेकानंदांच्या जीवन कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले. व्ही. पी. देसाई यांनी सूत्रसंचालन केले. श्रीधर सवाखंडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. एच. पी. कदम यांनी आभार मानले.
फोटो : ०२ अरुण जावळे
कºहाड येथील संत तुकाराम हायस्कूलमध्ये स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात अरूण जावळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा ग्रंथ भेट देण्यात आले.