कराड
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले सदाशिवगडावर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून रस्ता करण्यात येत आहे. यामुळे सदाशिवगडाच्या विकासासह सदाशिवाच्या दर्शनाचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे गड विभागाच्या विकासास कोणी खोडा घालू नये. विरोध करणाऱ्यांच्या सूचनांचे स्वागत करण्यात येईल. मात्र केवळ स्वार्थ जपण्यासाठी विरोध केलाच, तर विरोध मोडून रस्ता करण्यासाठी पाच गावांतील ग्रामस्थ सक्षम आहेत, असा इशारा पाच गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी दिला आहे.
किल्ले सदाशिवगडावर होणाऱ्या रस्त्याला विरोध करणाऱ्या वृत्तांना उत्तर देण्यासाठी सोमवारी पाच गावच्यावतीने येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारमाचीच्या सरपंच विद्या घबाडे, उपसरपंच प्रशांत यादव, बाबरमाचीच्या सरपंच सुनीता कदम, उपसरपंच राहुल जांभळे, राजमाचीचे सरपंच शिवाजीराव डुबल, वनवासमाचीचे सरपंच महादेव माने, विरवडे गावचे सह्याद्री कारखान्याचे संचालक रामदास पवार, अधिक सुर्वे. ॲड. चंद्रकांत कदम, प्रल्हादराव डुबल, ॲड..दादासाहेब जाधव, पोलीसपाटील मुकुंदराव कदम, दीपक लिमकर, प्रकाश पवार, एस. के. डुबल, सतीश पवार, जनार्दन डुबल आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ॲड .चंद्रकांत कदम व प्रल्हादराव डुबल म्हणाले, वयोवृद्ध, आजारी, अपंग, अनेक महिला व ज्यांना वेळेअभावी गडावर चालत जाणे शक्य नाही, असे लोक दर्शनापासून वंचित रहात आहेत. त्यामुळे गडावर रस्ता करावा, असे पाच गावांच्या ग्रामसभेत ठराव करण्यात आले आहेत. तसेच पाच गावांतील ग्रामपंचायती व सर्वपक्षीय संघटनांच्यावतीने पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे गडावर रस्ता व शिवसृष्टी प्रकल्प साकारण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. या मागणीची दखल घेऊन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी रस्त्याचे काम मार्गी लावले आहे. सदाशिवगडाच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या चार माच्यांनी गडाच्या विकासासाठी आजवर मोठयाप्रमाणात योगदान दिले आहे. चार माच्यांच्या ग्रामपंचायतींनी गडाच्या विकासासाठी नवनवीन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास कुणी खोडा घालू नये.
सदाशिवगड ही चार माच्यांसह परिसरातील गावांची अस्मिता आहे. गडाच्या संरक्षण व संवर्धनासाठी चार माच्या सक्षम आहेत. गडाच्या विकासकामांत आजवर ग्रामस्थांनी कधी विरोध केला नाही. त्यामुळे चार गावचे ग्रामस्थ करीत असलेल्या विकासकामांना कोणी विरोध करून त्यास विध्वंसक स्वरूप देण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा विरोध करणाऱ्यांचा विरोध मोडण्यासाठी ग्रामस्थ सक्षम आहेत, असा इशारा प्रकाश पवार यांनी दिला.