मेढा : उराशी मोठे स्वप्न बाळगून मेहनत आणि जिद्दीने त्याने दहावीची परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. ८ जून) असल्याने अन्य विद्यार्थ्यांप्रमाणे त्यालाही आपल्या निकालाबाबत ओढ लागली होती. परंतु रविवारी मेढा-सातारा मार्गावर एका भरधाव चारचाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला आणि त्याची सर्व स्वप्ने स्वप्नच बनून राहिली. अन् दहावीच्या निकालापूर्वीच नियतीने त्याच्या घात केला. जावळी तालुक्यातील ओझरे येथे राहणाऱ्या ओंकार तानाजी मर्ढेकर (वय, १६) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ओंकार हा मेरू विद्यामंदिर, वाघेश्वर शाळेचा विद्यार्थी होता. वर्गात हुशार, मनमिळावू अशी त्याची ओळख होती. अभ्यासाबरोबरच कला, क्रीडा क्षेत्रातही ओंकार निपूण होता.रविवारी (दि. ७) सकाळी दहाच्या सुमारास ओंकार व साहिल भोसले हे दोघेजण भणंग येथून ओझरेकडे चालत निघाले होते. यावेळी साताऱ्याहून महाबळेश्वरकडे जाणाऱ्या चारचाकी (एमएच १० एएन २८०२) गाडीने ओंकारला मागून जोरदार धडक दिली व गाडी तशीच भरधाव वेगाने निघून गेली. या अपघातात ओंकार गंभीररीत्या जखमी झाला.या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी ओंकारला तातडीने मेढा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच ओंकारचा मृत्यू झाला. दरम्यान, ओझरे ग्रामस्थांनी तातडीने मेढा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून अपघात झाल्याची माहिती देताच पोलिसांनी मेढा बाजार चौकात नाकाबंदी करून वाहनचालकदत्तात्रय हणमंत भगत (वय २८, रा. आटपाडी, जि. सांगली) याला अटक केले.ओंकारने दहावीची परीक्षा दिली असून, सोमवारी दहावीचा निकाल आहे. मात्र, निकालापूर्वीच ओंकारचा अपघाती मृत्यू झाल्याने ओंकारच्या कुटुंबासह ओझरे गावावर शोककळा पसरली आहे. (वार्ताहर)कुटुंबाचा आधारवड हरपला...ओंकारला तीन बहिणी. ओंकार सर्वात धाकटा. वडील एका डोळ्याने अंध असल्याने ते काही वर्षांपासून घरीच असतात. ओंकारची आई शेती व मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. ओंकार अभ्यासाचे धडे गिरवत असताना आपल्या बहिणींसोबत आईला शेती कामात मदत करीत होता. ओंकारच्या रूपाने त्याच्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला होता. मात्र, अपघातात झालेल्या मृत्यूने ओंकारच्या कुटुंबावर मोठा अघात झाला.
निकालापूर्वीच नियतीने केला घात!
By admin | Updated: June 8, 2015 00:51 IST