तारळे ग्रामपंचायतीवर मंत्री शंभुराज देसाई गटाची सत्ता होती. यावेळी राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्र होऊन देसाई गटाच्या सत्तेला सुरुंग लावला. आणि एकूण १७ जागांपैकी दहा जागा जिंकून ग्रामपंचायत आपल्याकडे खेचून घेतली. निवडणूक लढवताना राष्ट्रवादी आणि भाजपने युती केली होती. यामध्ये राष्ट्रवादीने अकरा जागा लढवल्या, तर भाजपने सहा जागा लढवल्या. अखेर निवडणूक जिंकून राष्ट्रवादी आणि भाजपचे मिळून प्रकाश जाधव, रुक्मिणी जंगम, रोहिणी जाधव, तोफिक डगरे, पूजा काटकर, प्रणील यादव, सम्राट महाडीक, अपर्णा जाधव, सुधा पवेकर, सागर सोनवले हे सदस्य निवडून आले. त्यातच सरपंच पदासाठीही खुला पुरुष प्रवर्ग आरक्षण पडल्यामुळे सरपंच कोण होणार, याकडे लक्ष लागून राहिले होते. सरपंच, उपसरपंच निवडीत कोणताही वाद न करता भाजप आणि राष्ट्रवादीने आपापसात निवडी करून सरपंचपदासाठी प्रकाश जाधव आणि उपसरपंचपदासाठी भाजपच्या सुधा कोळेकर यांचे अर्ज दाखल केले. त्यांना विरोध करीत मंत्री शंभुराज देसाई गटाच्या सदस्यांनीही सरपंचपदासाठी गौरव परदेशी आणि उपसरपंच पदासाठी शंकर साळुंखे यांचे अर्ज दाखल केले होते. मात्र, सरपंच म्हणून प्रकाश जाधव आणि उपसरपंचपदासाठी सुधा कोळेकर यांना दहा मते मिळाली. त्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
निवडी घोषित झाल्यानंतर माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि सत्यजित पाटणकर यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार केला. राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य सदाभाऊ जाधव तसेच भाजपचे रामभाऊ लाहोटी, अभिजित जाधव आदींसह प्रमुख कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला.