औंध: गोपूज येथील शेतकरी विकास दत्तात्रय घाडगे यांनी डांबर प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणामुळे पिकांची नुकसानभरपाई मिळण्यासाठी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्याअनुषंगाने गोपूज येथे झालेल्या समन्वय बैठकीत कृषी विभागाने शेतकऱ्यांना नुकसान ठरवून द्यावे, असा आदेश तहसीलदारांनी दिला आहे.
गोपूज येथे झालेल्या बैठकीत तहसीलदार किरण जमदाडे, सत्यवान कमाने, तलाठी उत्तम चव्हाण, औंध पोलीस ठाण्याचे पंकज भुजबळ, वडूजचे देवकर कंपनी प्रतिनिधी सोपान खराडे, अनिल पवार, शेतकरी विकास घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कंपनी आणि शेतकरी यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये कोणकोणत्या पिकांचे किती नुकसान झाले व किती भरपाई देता येईल, यासाठी कृषी विभागाकडून नुकसान रकमेचा अहवाल सादर झाल्यानंतर शेतकऱ्याला द्यावी, अशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर विकास घाडगे यांनी पुढील सोमवारपर्यंत आत्मदहन तात्पुरते स्थगित केल्याची माहिती दिली.