सातारा : कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले असताना थकीत वीज बिलामुळे त्यांच्या घरातील वीज तोडण्याचा प्रकार सुरू झालेला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे भविष्य अंधारात येण्याची शक्यता असल्याने वीज तोडली गेल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी दिला आहे. आंदोलनात सहभागी महिलांनी डोक्यावर जळणाचा बिंडा घेऊन सरकारचा तीव्र निषेध केला.
कोरोना महामारीने कहर माजवला असल्याने त्याच्या निवारणासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या. त्यामध्ये लॉकडाऊनचा पर्याय केल्याने सर्वसामान्य जनतेचे कंबरडेच मोडले आहे. त्यांना जीवनच असह्य झाले आहे.
अशा एका नैसर्गिक परिस्थितीतून सर्वसामान्य जनता जात असतानाच पेट्रोल, डिझेल, गॅस इत्यादी वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्याने एकूणच सर्वसामान्य जनतेच्या जीवनाशी निगडित सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्याने कोरोना जगू देईना आणि सरकार भीक मागू देईना, अशी अवस्था जनतेची झाली आहे. याचा विचार करून तातडीने पेट्रोलजन्य पदार्थांच्या किमती कमी करून सरकारी नियंत्रणात आणाव्यात आणि वाढती महागाई रोखण्यासाठी कडक उपाययोजना तातडीने सरकारने करावी अशी मागणी करण्यात आली.
तसेच कोविड-१९ च्या कालखंडात लोकांची आर्थिक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाल्याने आणि सरकारने काही प्रमाणात दिलासा देण्याचे दाखविल्यामुळेच सामान्य जनतेची घरगुती वीज बिले थकीत राहिली. त्याबाबत कोणताच दिलासा शासनाने न देता जनतेच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे वीज मंडळाने बिल न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला व पुन्हा पैसे भरल्यानंतर जोडणीसाठी वेगळा चार्ज भरावा लागत सल्याने सर्वसामान्य जनतेचे जीवन अंधकारमय झाले आहे. तसेच मुलांचे ऑनलाइन शिक्षण व परीक्षा चालू सल्याने सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्यावर ऑनलाइन आभ्यासापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यांना अंधारमय जीवन जगावे लागत असून शासनाने लवकरात लवकर जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी चंद्रकांत खंडाईत, दादासाहेब केंगार, श्रीरंग वाघमारे, वसंत खरात, बाळकृष्ण देसाई, बबनराव करडे, फारुख पटणी, सुभाषराव गायकवाड, संदीप कांबळे, गणेश कारंडे, गणेश भिसे, सुधाकर काकडे, आयेशा पटणी, कल्पना कांबळे, शशिकांत खरात यांची उपस्थिती होती.
फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीतर्फे महिलांनी डोक्यावर जळणाचा बिंडा घेऊन सरकारचा तीव्र निषेध केला. (छाया : जावेद खान)