रहिमतपूर : कोरोना या जागतिक महामारीने रहिमतपुरातील जनता वर्षभरापासून त्रस्त आहे. त्यामुळे जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य वीज वितरण कंपनीने वर्षभरातील नागरिकांची घरगुती व शेतीचे वीज बिल संपूर्णपणे माफ करावे, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.
वीज वितरण कंपनीच्या रहिमतपूर उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोरोनानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तेव्हापासून जनता त्रस्त आहे. या त्रासापासून नागरिकांची अद्याप सुटका झालेली नाही. आजही कोरोना बाधित रुग्ण रहिमतपुरात सापडत आहेत. अनेकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. वर्षभरामध्ये टाळेबंदी, संचारबंदीमुळे रहिमतपुरातील शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक, व्यापारी, कामगार, कर्मचारी आदी सर्वच स्तरातील नागरिक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व व्यापाऱ्यांना पुन्हा पायावर उभं राहण्यासाठी वीज वितरण कंपनीने घरगुती व शेतीपंपांचे वीज बिल संपूर्णपणे माफ करून सहकार्य करावे.
निवेदनावर भाजपचे शहराध्यक्ष शेखर माने, सतीश लवंगारे, उत्कर्ष माने, सारिका टकले यांच्या सह्या आहेत.