सातारा : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचे चांगले काम काही लोकांना पाहवत नाही. सध्या पूर्ण बहुमताचे सरकार असून, लोकमताचा पाठिंबा या सरकारला आहे. केवळ सरकारला अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे, अशी टीका गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.
ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्र पोलिसांची ही चांगली यंत्रणा असताना आणि महाराष्ट्र पोलिसांचे जगभर नाव घेत असताना त्यांच्यावर गैरविश्वास दाखवून बाहेरच्या यंत्रणेमार्फत तपास करा, असे म्हणायचे. हा महाराष्ट्रात राहून येथील पोलिसांवर गैरविश्वास दाखवण्यासारखे आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत असतात. एखाद्या बाबीचा तपास करताना संबंधित यंत्रणेच्या अधिकृत प्रतिनिधींकडून तपासात काय प्रगती झाली आहे, हे बाहेर येत नाही तोपर्यंत बाहेर केवळ वावड्या उठत असतात, त्यावर बोलणे योग्य नाही.’’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार, मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारची भक्कमपणे वाटचाल सुरू आहे. गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल होणार का, या प्रश्नावर मी काही बोलू शकत नाही. गृहमंत्रालयाच्या समोर नेमकी परिस्थिती येईल त्यानुसार निर्णय घेतला जाईल.
सध्या पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाल्याचे चित्र आहे. मुंबई पोलिसांची नाचक्की झाली असून, ती भरून काढण्यासाठी काय केले जाईल, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्र पोलीस दल मोठे आहे. अनेक अधिकारी आहेत. एखादा अधिकारी चुकला म्हणून सगळ्यांना दोषी धरणे योग्य नाही’’; तसेच पोलिसांची प्रतिमा मलीन झाली, असे म्हणणे योग्य नाही. यापुढेही मुंबई पोलीस नावलौकिकाला साजेसे काम करत राहतील, असा विश्वासदेखील देसाई यांनी व्यक्त केला.
वाजे प्रकरणाची मुख्यमंत्र्यांना सर्व माहिती होती, तरी त्यांनी या प्रकरणावर पांघरूण घातले आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे, यावर मंत्री देसाई म्हणाले, ‘‘टीका करणे विरोधकांचे कामच आहे, ते काही बोलतील त्या प्रत्येक गोष्टीला सरकार उत्तर देऊ शकणार नाही.’’ परमबीर सिंग यांच्या संपत्तीची चौकशी करण्याच्या मुद्यावर मंत्री देसाई यांनी हा विषय माझ्यापर्यंत आलेला नाही, तसेच माझ्या कार्यातील विषय नाही, त्यामुळे याबाबत शासन स्तरावर योग्य व्यक्तीला विचारा, असे म्हणत त्यांनी टाळले.