सातारा : येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या एका कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिला कामगाराचा विनयभंग केल्याप्रकरणी सुपरवायझर महेश सुतार (रा. महाडिक काॅलनी, कारंडवाडी, ता. सातारा) याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या सुपरवायझरने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित महिला व संशयित सुतार हे औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या एका कंपनीमध्ये एकत्र काम करतात. दरम्यान, संशयिताने पीडित महिलेसोबत वारंवार जवळीक साधून तसेच कंपनीतील काम सुटल्यावर तिला रस्त्यात अडवून माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, तुझ्या कंपनीतील पगाराचे टेन्शन घेऊ नको, ते मी मॅनेज करतो, असे म्हणून वारंवार तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच कंपनीपासून तिच्या घरापर्यंत तिचा वारंवार पाठलाग करून विनयभंग केल्याचे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. एका महिला कामगाराबाबत सुपरवायझरने गैरवर्तणूक केल्याने औदयोगिक वसाहतीमध्ये खळबळ उडाली आहे. संबंधित सुपरवायझरला अटक करण्यासाठी पोलीस तेथे पोहोचले असता, तो तेथून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस नाईक चव्हाण करत आहेत.