वडूज : माजी सभापती संदीप मांडवे हे दहा वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असून खटाव तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्याविरोधात तक्रार देऊन बदनामी करणाऱ्याची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे ग्रामस्थांनी केली आहे.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माजी सभापती संदीप मांडवे यांच्या लोकाभिमुख कार्याला खोडा घालण्यासाठी व अशा परिस्थितीत केवळ त्यांची सामाजिक प्रतिष्ठा कमी करण्याच्या हेतूने तक्रार दाखल केली आहे. वास्तविक त्यांनी असा कोणताही गुन्हा केला नव्हता. तक्रारदार समीर रज्जाक तांबोळी हे गुरसाळे व पडळ कोरोना सेंटरमध्ये नोडल ऑफिसर म्हणून काम पहात होते; परंतु तांबोळी हे कधीही सेंटरमध्ये उपस्थित राहिलेले नाहीत. त्यांनी कोरोनाकाळात गुरसाळे व पडळ सेंटरमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून ऑक्सिजन सुविधा कार्यान्वित केली नाही. स्वत:ची जबाबदारी टाळण्यासाठी सुविधा वापरायोग्य बनविली नाही. त्यामुळे ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांना दाखल करून घेता येत नव्हते. त्यामुळे बेजबाबदार अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी होऊन त्यावर कायदेशीर कारवाई करावी.
माजी सभापती संदीप मांडवे यांच्याविरुद्ध दाखल तक्रार सत्वर काढून टाकण्यात यावी. असे न झाल्यास शनिवार, दि. १४ ऑगस्टपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल.
निवेदनावर दोनशेहून अधिकजणांच्या सह्या आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे हणमंत शिंदे, उपसरपंच ॲड. रोहन जाधव, विजय शिंदे, योगीराज इनामदार, शैलेश वाघमारे आदींनी निषेध मत व्यक्त केले. यावेळी माजी सभापती कैलास घाडगे, बाळासाहेब पोळ, बाबा शिंदे, विजय काळे, लोणीचे सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, येरळवाडीचे सरपंच योगेश जाधव, कातर खटावचे उपसरपंच ॲड. नितीन शिंगाडे, धकटवाडीचे सरपंच मोहन जाधव, राष्ट्रवादीचे अविनाश सावंत, अजित देशमुख, माजी सरपंच लालासाहेब माने उपस्थित होते.