.........
विक्रेत्यांचे अतिक्रमण
सातारा : शहरातील विविध चौकांमध्ये भाजीविक्रेत्यांनी फूटपाथवर अतिक्रमण करून आपले बस्तान बसविले आहे. कोरोनाकाळात भाजी मंडया बंद ठेवण्यात आल्या होत्या. या काळात भाजीविक्रेते परवाना काढून फिरत होते. काही भाजीविक्रेते चौकात बसून व्यवसाय करीत होते. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव असल्याने त्यावेळी ते या विक्रेत्यांकडून भाजी खरेदी करीत होते.
........
दिंडीचे प्रस्थान
सातारा : ‘ओम श्री साईनाथ की जय’च्या जयघोषात केळकर ते शिर्डी पायी दिंडी सोहळा व भक्तिपूर्ण वातावरणात शिर्डीकडे रवाना झाला. यावर्षी कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाने सामाजिक आरोग्य जपण्यासाठी मोजक्याच पंचवीस भक्तांचे केळकर ते शिर्डी साई दिंडीचे प्रस्थान झाले. यावेळी साईपालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली.
...........
नागरिकांची कुचंबणा
वडूज : वडूज (ता. खटाव) येथील बाजार पटांगण परिसरात स्वच्छतागृह नसल्याने बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांची कुचंबणा होत आहे. वडूज हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने शहरामध्ये आसपासच्या गावांतून कामासाठी येणाऱ्या नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. बाजार पटांगण परिसरामध्ये आठवडी बाजार भरतो. या बाजारात ग्रामीण भागात शेतकरी मोठ्या संख्येने शेतमाल विक्रीसाठी घेऊन येतात.
........
रॅलीद्वारे प्रबोधन
सातारा : जावळी तालुक्यात विपुल वनसंपदा असून, काही समाजकंटक गैरसमजुतीतून विनाकारण वणवे लावत आहेत. त्यामुळे दुर्मीळ औषधी वनस्पती, सूक्ष्मजीव यांचा यामध्ये बळी जात आहे. वणवे रोखण्यासाठी वन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन जावळी तालुक्याचे वनक्षेत्रपाल आर. एस. परदेशी यांनी केले. बहुले (ता. जावळी) येथे वनविभागाच्या वतीने वन-वणवा जनजागृती सप्ताह प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.
.......
वाहनधारकांची कसरत
सातारा : सातारा शहराच्या विकासातील महत्त्वाचा दुवा असणाऱ्या औद्योगिक वसाहतीला ग्रहण लागले आहे. सुमारे ६०० हून अधिक छोट्या-मोठ्या कंपन्या असलेल्या वसाहतीतील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. अनेक ठिकाणी अरुंद असणारे रस्ते, पार्किंगचा उडालेला बोजवारा यांमुळे औद्योगिक विकासाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे.
.......
बिल भरण्याचे आवाहन
सातारा : शहर व उपनगरांतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत लष्कर पाणीपुरवठा केंद्राद्वारे पाणीपुरवठा होत असलेल्या ग्राहकांनी आपले थकीत पाणीबिल दि. २८ फेब्रुवारीपर्यंत भरावे, असे आवाहन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.
दारूबंदी कागदावर
सातारा : सुमारे अठरा वर्षांपूर्वी जावळी तालुका दारू दुकानमुक्त करण्यासाठी आनेवाडी येथील महिला रणरागिणींनी खऱ्या अर्थाने लढा देऊन तालुका दारूमुक्त केला होता. मात्र दारूबंदीसाठी मतदान होऊन महिलांनी बंद केलेल्या दारूची आनेवाडी गावाच्या प्रवेशद्वारावरच मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री सुरू आहे. कागदावर दारूबंदी आणि गावात खुलेआम दारूविक्री, अशी या गावातील अवस्था आहे.
........
टोलनाक्यावर मार्गदर्शन
सातारा : आपल्या घरी आपली रोज वाट पाहणारे जिवलग आहेत; त्यामुळे महामार्गावरून प्रवास करताना प्रत्येक वाहनचालकाने नियमांचे काटेकोर पालन करावे व सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी केले. रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात आनेवाडी टोलनाक्यावर करण्यात आली.
..........
रानगव्यांचा वावर
सातारा : वनक्षेत्र व परिसरामध्ये आढळणाऱ्या मानवी वस्तीत रानगव्यांचा वावर वाढत असल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी रानगव्यांचे दर्शन होत आहे. गेल्या काही दिवसांपासून खटाव, वाई आणि खंडाळा या तालुक्यांतही रानगव्यांचे दर्शन होऊ लागले आहे. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.