...........
रस्ता दुरुस्तीची मागणी
सातारा : खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील पुसेगावसह नेर, धावडदरे, कटगुण, काटकरवाडी या गावांमधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून वाहनचालकांची वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. अनेकदा या रस्त्यांवर लहान मोठे अपघातही झाले आहेत. लोकप्रतिनिधीसह बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
..........
मावळ्याकडून स्वच्छता
सातारा : इतिहासाचा साक्षीदार असलेल्या भूषणगड किल्ल्यास भेट देत साताऱ्यातील मावळ्यांनी तेथील परिसराची संपूर्ण स्वच्छता केली. युवकांच्या या बांधणीचे विशेष कौतुक होत आहे. ‘रक्षक ग्रुप’च्या माध्यमातून हे युवक कार्य करत असतात. गडकोटांचे संवर्धन, संरक्षण व रक्षणाच्या हेतूने या ग्रुपचे कार्य सध्या सुरू आहे.
......
वाहतुकीसाठी खुला
सातारा : शाहूपुरी मोळाचा ओढा परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून तो नागरिकांसाठी खुला केला. माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांनी पुढाकार घेत त्या रस्त्याची स्वखर्चातून डागडुजी केली. मोळाचा ओढा येथील आझाद नगर, गंगासागर कॉलनी, चिंतामणी सोसायटी, ओंकार सोसायटीकडे जाणारा रस्ता काही व्यक्तीने दगड व इतर वस्तू टाकून बंद केला होता.
......................
इंटरनेटचा बोजवारा
बामनोली : जावळी तालुक्यात अनेक भागात इंटरनेट सेवेचा पुरता बोजवारा उडाला असून खंडित सेवेमुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तो मोबाईल रेंज आणि इंटरनेटचा खेळखंडोबा झाल्याने पोस्ट बँकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची ससेहोलपट सुरू आहे. डोंगरदऱ्यांनी व्यापलेला आणि दुर्गम समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील कोपऱ्यात नागरिकांच्या हातात मोबाईल पोहोचले असल्याने ग्राहकांकडून तक्रारी केल्या जात आहेत.
.,......
महाबळेश्वरला सुरक्षा सप्ताह
महाबळेश्वर : सध्या रस्त्यावर वाहनांची संख्या वाढू लागली आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यास अपघात घडतात. सुरक्षित प्रवासामुळे एसटीने प्रवाशांत आपुलकीचे स्थान मिळविले असून, हा विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी एसटी चालकांनी दक्ष रहावे, असे आवाहन महाबळेश्वर आगाराचे व्यवस्थापक नामदेवराव पतंगे यांनी केले.
.......
कर्मचारी नेमा
सातारा : साताऱ्यातील ग्रेडसेपरेटरमधून प्रवास करण्याच्या नियमावलीचा भंग राजरोस वाहनधारकांकडून होत आहे. अनेक वाहनधारक एकेरी वाहतुकीसाठी आरक्षित असणाऱ्या मार्गामध्ये स्वतःची वाहने पुढे नेतात. या नियमभंगामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे.
..................................
वाहतुकीचा खोळंबा
सातारा : सातारा शहरातील मध्यवस्तीमधील रस्ते आधीच अरुंद असून, या रस्त्यावरच थांबलेल्या वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. शहरातील बाजारपेठेत सर्वच रस्त्यावर लगतच्या गाळ्याचे अतिक्रमण झाले. त्यामुळे वाहन पार्किंगला जागा उरली नसल्याने ही वाहने रस्त्यावरील वाहतुकीचा अडथळा ठरत आहेत.
..........
अतिक्रमणे वाढली
सातारा : साईबाबा मंदिर गोडोली नाका रस्त्यावर भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीची कोंडी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, नगरपालिकेने या भाजी विक्रेत्यांना हटवून त्यांची दुसरीकडे सोय करावी, अशी मागणी वाहनधारक करू लागले आहेत.
........
बटाट्याचा दर घसरला
सातारा : बटाटा उत्पादकांना प्रति क्विंटल नऊशे ते बाराशे रुपये दर मिळत असल्याने लागवडीचा खर्च नुकसानीत जात आहे. खटाव तालुका उत्तर भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नवीन बटाट्याची आवक होत असल्याने बाजारात बटाट्याला २५०० ते २८०० रुपये असा उच्चांकी दर मिळत होता.
........