सातारा : ‘सातारा शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी आपण नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना यापूर्वीच सूचना दिल्या आहेत. कटुता निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमणे हटवून पालिकेला सहकार्य केले पाहिजे. गरीब, श्रीमंत, अधिकारी, पदाधिकारी असा कोणताही भेदभाव न ठेवता पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात शहरातील सर्व अतिक्रमणे तातडीने हटवावीत,’ अशा सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालिका प्रशासनाला केल्या आहेत. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे सातारा शहरातील रस्त्यांवर वाहतुकीच्या कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यातच शहरात ठिकठिकाणी झालेल्या अतिक्रमणांमुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. कोणताही भेदभाव न ठेवता शहरातील सर्व अतिक्रमणे हटविण्याबाबत आपण स्वत: पालिका प्रशासनाला यापूर्वीच सूचना केल्या आहेत. दिशा विकास मंचचे अध्यक्ष सुशांत मोरे यांनीही अतिक्रमण हटविण्याची मागणी करून आंदोलनाचा इशारा पालिका प्रशासनाला दिला आहे. मोरे यांची भूमिका योग्य असून, शहराला सुसूत्रता येण्यासाठी अतिक्रमणे हटवण्याची नितांत गरज आहे. शहराचा कायापालट करण्यासाठी यापुढील कालावधीत अनेक योजना पालिकेमार्फत राबविण्यात येणार असल्याचेही शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कोणताही भेदभाव न ठेवता अतिक्रमणे हटवा
By admin | Updated: November 7, 2014 23:32 IST