दहीवडी : ‘माण तालुक्यातील काही भागात तीव्र पाणी टंचाई झाली असून, वेळीच दखल घेतली नाही तर प्रांतकार्यालयाला टाळे ठोकू’, असा इशारा सातारा जिल्हा उपशिवसेना प्रमुख संजय भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, प्रांताधिकाऱ्यांकडे प्रसिद्धी माध्यमे आणि प्रत्यक्ष भेटून लक्ष वेधण्याचा व टंचाईची वस्तुस्थिती निदर्शनास आणून देण्याचा मी स्वत: प्रयत्न केला आहे. माणची जनता कोरोनाच्या या महामारीत आणि संचारबंदी तसेच पाणीटंचाई या तिहेरी संकटात अडकलेली आहे. याकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा प्रांत कार्यालयास टाळे ठोकणार आहे.
जनतेच्या या महासंकटांकडे पाहायला माण-खटावचे उपविभागीय अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्याकडे वेळ नसल्याचे त्यांच्या आजच्या वर्तणुकीवरून स्पष्ट झाले आहे. पाणी टंचाईवर चर्चा करण्यासाठी येत आहे, असे सांगताच परवानगी देणारे दहा मिनिटांत ऑफिसमधून गायब होतात, हा जनतेचा अनादर नाही का?
म्हणूनच दोन दिवसांत टंचाई दूर करा, अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकणार. जनतेसाठी लागेल त्या कारवाईस व शिक्षेस सामोरे जाऊ, यासाठी प्रशासनच जबाबदार राहील, असेही भोसले यांनी शेवटी पत्रकात म्हटले आहे.