फलटण : ‘व्यसन ही मानवाला लागलेली कीड असून त्यामुळे मानवी जीवन उध्वस्त होत आहे. मनुष्याने व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करावा आणि आपले जीवन पुण्य व सत्कर्म करण्यात व्यतीत होईल असा प्रयत्न करावा’, असे आवाहन मुनिश्री प्रतीक सागर महाराज यांनी केले.सत्संग कमिटीच्यावतीने येथील मुधोजी बालक मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्म सत्संग महोत्सवात ते बोलत होते. प्रतीक सागर महाराज पुढे म्हणाले, स्त्री ही लक्ष्मी, सरस्वती व दुर्गा असल्याचे नमूद करीत ती केवळ लक्ष्मीचे रुप नसून मुलांना शिकविताना त्यांच्यावर योग्य संस्कार करताना ती सरस्वती असते. अत्याचाराला विरोध करण्यासाठी किंंबहुना अत्याचार संपविण्यासाठी ती दुर्गेचे रुप धारण करते. अशा लक्ष्मी, सरस्वती व दुर्गास्वरुप स्त्रीचा नेहमीच आदर व सन्मान झाला पाहिजे.स्त्री भृणहत्येला हिंंदुस्थानातील सर्व जातीधर्मांनी विरोध केला पाहिजे. हे पाप थांबविले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करीत प्रतीक सागर महाराज म्हणाले, आई ही ममतेचा सागर असून आईला कधीही अंतर देवू नका. तुम्ही आज जे आहात ते आईच्या संस्कारामुळेच. आजपर्यंत ज्या महान व्यक्ती होवून गेल्या त्यांचा परिचय पहाता आईच्या संस्कारामुळेच त्या महान झाल्या असल्याचे स्पष्ट होते, असेही ते म्हणाले. यावेळी जैन बांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)
व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करा
By admin | Updated: December 4, 2014 23:46 IST