पाटण : काडोली (ता. पाटण) येथील महिला कोयना नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेली. यामध्ये तिचा मृत्यू झाला असून, मृतदेह घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावरील संगमनगर धक्का पुलाजवळ सापडला. मनीषा जयवंत सुतार असे मृत महिलेचे नाव आहे. मनीषा सुतार (वय २७, रा. काडोली) ही महिला काल, शुक्रवारी गाय चरण्यासाठी मुरुड डोह नावाच्या शिवारात गेली होती. ती त्या दिवशी घरी परतली नाही. त्यामुळे काडोलीच्या ग्रामस्थांनी तिचा शोध सुरू केला. आज, शनिवारी ग्रामस्थांनी कोयना नदीकाठच्या वांझोळे, कराटे, मारूल शिरळ, येराड या गावांमध्ये तिचा शोध घेतला. कोयना नदीवरील येरळे पूल, मूळगाव पूल व संगमनगर धक्का पूल परिसरातही मनीषाचा शोध घेतला असता संगमनगर धक्का पुलाजवळ कोयना नदीपात्रात तरंगत असलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. (प्रतिनिधी)
कोयनेच्या पुरातून वाहून गेलेल्या महिलेचा मृत्यू
By admin | Updated: August 3, 2014 22:49 IST