ऑनलाइन लोकमतसातारा, दि. ४ : भक्ष्याच्या दिशेने टाकलेली झेप वीज तारांवर पडल्याने तेथेच शॉक लागून बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. क-हाड तालुक्यातील वनवासमाची गावच्या तांबट शिवारात गुरूवारी दुपारी ही घटना घडली. तारेत अडकलेला बिबट्याचा मृतदेह वनविभागाने ताब्यात घेतला आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, डोंगराच्या पायथ्याला वनवासमाची गावचे शिवार आहे. या शिवारातील तांबट परिसरात रमेश गरूड या युवकाची ऊसाची शेती आहे. तसेच ऊसानजीक दोडक्याचे शिवार आहे. गुरूवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास रमेश दोडका तोडण्यासाठी गेला होता. त्यावेळी ऊसाच्या शेतावरून गेलेल्या वीज तारेत बिबट्या अडकून लटकत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने याबाबतची माहिती तळबीड पोलिसांना तसेच वनविभागाला दिली. काही वेळानंतर तळबीडचे पोलीस त्याठिकाणी दाखल झाले.
मात्र, माहिती दिल्यानंतर तब्बत अडीच तासाने वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी आले. त्यांनी तारेत अडकलेला बिबट्या खाली काढून ताब्यात घेतला. संबंधित बिबट्या शेताच्या बांधावर असलेल्या सुबाभळीवर असावा व तेथून खाली झेप घेताना तो तारेत अडकला असावा, असा वनविभागाचा कयास आहे. घटनास्थर्ळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.